राहेरी येथील पुलावर दाेन्ही बाजूने उभारले अडथळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:33 IST2021-09-13T04:33:09+5:302021-09-13T04:33:09+5:30
राहेरी बु : नागपूर ते मुंबई राष्ट्रीय महामार्गवरील खडकपूर्णा नदीवरील पूल हा कमकुवत झालेला असल्याने त्यावरील जड वाहतुकीस ...

राहेरी येथील पुलावर दाेन्ही बाजूने उभारले अडथळे
राहेरी बु : नागपूर ते मुंबई राष्ट्रीय महामार्गवरील खडकपूर्णा नदीवरील पूल हा कमकुवत झालेला असल्याने त्यावरील जड वाहतुकीस बंदी घालण्यात आली हाेती़ मात्र, तरीही या पुलावरून जड वाहतूक सुरूच हाेती़ त्यामुळे ११ सप्टेंबरला भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पुलाच्या दाेन्ही बाजूने अडथळे उभारले आहेत़ या अडथळ्यांमधून आता केवळ छाेटी वाहनेच जाऊ शकणार आहेत़
नागपूर ते मुंबई राष्ट्रीय मार्गावरील ७५३ सी वरील पुलाच्या कामासाठी शासनाने १० कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे. नदीवरील पूल पूर्ण होईपर्यंत यावरील वाहतूक तढेंगाव फाटा येथून देऊळगाव मही मार्गे वळविण्यात आली आहे़ त्यासाठी पुलाच्या दोन्हीही बाजूला अडथळे उभारण्यात आले होते़ परंतु, तरीही खडकपूर्णा नदीच्या कमकुवत पुलावरून अवजड वाहतूक सुरूच होती़ मधल्या काळात किनगाव राजा पोलीस प्रशासनाने वाहनधारकांना दंड करून ही वाहतूक बंद केली होती.
वळणमार्ग आणि पुलाचे काम संथ गतीने सुरू आहे़ या पुलावरील अवजड वाहतूक पूर्णपणे बंद करण्यासाठी ११ सप्टेंबरला भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पुढाकार घेऊन दोन्हीही बाजूने पक्के खांब उभारून त्यावर जमिनीपासून नऊ फूट उंचीपर्यंत अडथळे बसविण्यात आले आहे़ त्यामुळे आता अवजड वाहतूक बंद होणार मोठी वाहने पूर्णपणे बंद होतील. परंतु, तरीही त्या ठिकाणी प्रशासनाला कायमस्वरूपी निगराणी ठेवावी लागणार आहे.
पूल सार्वजनिक बांधकामकडे हस्तांतरित
आता हा पूल भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडून सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या कडे हस्तांतरित केला आहे़ यापुढे अवजड वाहतुकीची जबाबदारी ही सार्वजनिक बांधकाम विभाग यांची राहणार आहे़ पुलाचे काम लवकर मार्गी लागावे, अशी अपेक्षा नागरिक करीत आहे़ यावेळी किनगाव राजा ठाणेदार युवराज रबडे, श्रावण डोंगरे, सुधाकर गवई, नाजीम शेख, आदी कर्मचारी उपस्थित हाेते़