पोषण आहाराचा पदाधिका-यांनी घेतला आढावा
By Admin | Updated: November 29, 2014 22:48 IST2014-11-29T22:48:25+5:302014-11-29T22:48:25+5:30
चिखली तालुक्यातील प्रकार; तक्रारीत अन् पोषण आहारातही आढळले तथ्य.
_ns.jpg)
पोषण आहाराचा पदाधिका-यांनी घेतला आढावा
चिखली (बुलडाणा): तालुक्यातील अंगणवाडी केंद्रातील बालकांना निकृष्ट दर्जाचा आहार दिल्या जात असल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच जिल्हा परिषद प्रशासन खडबडून जागे झाले आणि वास्तव परिस्थिती जाणून घेण्यासाठी जि.प. उपाध्यक्ष पांडुरंग पाटील खेडेकर आणि महिला व बालकल्याण सभापती आशाताई झोरे यांनी प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेऊन दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.
पाच वर्षापर्यंतच्या बालकांचे कुपोषण होऊ नये आणि त्यांना सकस आहार मिळावा सोबतच त्यांच्यात शाळा आणि शिक्षणाबद्दलची गोडी वाढीस लागावी या उदात्त हेतूने शासनाने महिला व बालकल्याण विभागामार्फत सुरू केलेल्या अंगणवाडी केंद्रांमध्ये बालकांना द्यावयाच्या सकस आहाराचा दर्जा हा चिंतेचा विषय ठरला आहे. शनिवार २९ नोव्हेंबर रोजी याबाबत लोकमतने आवाज उठविल्याबरोबर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पांडुरंग पाटील खेडेकर आणि महिला व बालकल्याण सभापती आशाताई झोरे यांनी एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाला पत्रकारांसह भेट देऊन तक्रारीची पडताळणी केली. या तक्रारीमध्ये तथ्य आढळून आल्याने तालुक्यातील भरोसा येथील अंगणवाडी केंद्राला भेट देऊन प्रत्यक्ष पोषण आहारातील प्रमुख कडधान्याची पाहणी केली असता हरभरा, चवळी यांना मोठय़ा प्रमाणात कीड लागलेली आढळून आली.
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व महिला बालकल्याण विभागाच्या सभापती यांनी प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीची पडताळणी केल्यानंतर कदाचित थातूरमातूर कारवाई करून कनिष्ठ पातळीवरील कर्मचार्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्यातही येईल. मात्र, या संपूर्ण प्रकाराला जबाबदार असणार्या वरिष्ठ अधिकार्यांवर कारवाई करण्याची धमक जिल्हा परिषद आणि शासनातील पदाधिकारी दाखवतील काय, असा खरा प्रश्न आहे.