आता वेध लग्नोत्सवाचे !
By Admin | Updated: November 24, 2015 01:27 IST2015-11-24T01:27:18+5:302015-11-24T01:27:18+5:30
तुळशी विवाहास थाटात प्रारंभ.

आता वेध लग्नोत्सवाचे !
खामगाव : दीपावली संपताच वेध लागतात ते त्रिपुरारी म्हणजेच कार्तिकी पौर्णिमेचे. कार्तिक एकादशीनंतर तुळशी विवाहास प्रारंभ होत असल्यामुळे या पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. तथापि, २३ ते २५ हे तीन तुळशी विवाहासाठी शुभ मुहूर्त असून, तुळशी विवाहानंतरच खर्या अर्थाने विवाह मुहूर्तास प्रारंभ होतो. भारतीय संस्कृती ही मुळातच भावात्मकता प्रधान आहे. त्यामुळे तुळशीला हिंदू संस्कृतीत कन्येचे स्थान दिले जाते. तुळशीची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होत असल्याचा समज असल्यामुळे पोटच्या कन्येला उत्तम वर मिळावा, तिला सर्व सुख प्राप्त व्हावे, यासाठी बहुतांश नागरिक आनंदाने हा उत्सव साजरा करतात. कार्तिकी व्दादशीपासून पौर्णिमेपर्यंंत एखाद्या दिवशी सायंकाळी तुळशी विवाहाचे आयोजन करण्यात येते; मात्र बहुतांश नागरिक यासाठी व्दादशीचा दिवस निवडतात. आषाढी एकादशी म्हणजे देवशयनी एकादशी, कार्तिक म्हणजेच प्रबोधिनी एकादशी व चातुर्मासाच्या कालावधीत विवाह मुहूर्त नसतात. हा कालावधी मुहूर्त शास्त्रानुसार विवाहासाठी प्रतिकुल मानला जातो. कार्तिक शुद्ध एकादशीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंंत तुळशी विवाह करण्याची परंपरा आहे. तुळशी विवाहानंतर विवाहासाठी अनुकूल वेळ प्राप्त होते. त्यामुळे तुळशी विवाहापासून पंचांगात विवाह मुहूर्त दिलेले असतात. यावर्षी २३ ते २५ नोव्हेंबर तीनच दिवसाचे मुहूर्त तुळशी विवाहासाठी आहेत. या कालावधीत सर्वत्र तुळशी विवाहाचा सोहळा दिसून येणार आहे. तुळशी विवाहानंतर सर्वत्र ह्यशुभमंगल सावधानह्ण चा ध्वनी कानी पडण्यास सुरुवात होणार आहे. दरम्यान, तुळशी विवाहासाठी लागणार्या बोर, भाजी, आवळा, बांगड्या, हरभर्याची भाजी आदी साहित्याची दुकाने शहरातील मुख्य रस्त्यांवर थाटली जावू लागली आहेत. ग्रामीण भागातील विक्रेते यासाठी शहरात दाखल झाले असून, तुळशी विवाहनिमित्त काही प्रमाणात त्यांना रोजगार प्राप्त होत आहे.