आता हमालांच्या संपामुळे तूर खरेदी ठप्प

By Admin | Updated: April 14, 2017 00:47 IST2017-04-14T00:47:38+5:302017-04-14T00:47:38+5:30

नांदुरा- हमालांनी मोजणीचे काम सोडून संप केल्याने बाजार समिती व नाफेडची खरेदी पुन्हा ठप्प पडली. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा माल परत घेऊन जाण्याचा नाहक त्रास सोसावा लागला.

Now the purchase of junk for the hamalas collapsed | आता हमालांच्या संपामुळे तूर खरेदी ठप्प

आता हमालांच्या संपामुळे तूर खरेदी ठप्प

नांदुरा : मागील दोन दिवसांपासून रात्रीच्या अंधारात हमालांनी ‘एफसीआय’ च्या पोत्यांमध्ये निकृष्ट दर्जाचा तुरीचा व्यापाऱ्यांचा माल भरताना रंगेहात पकडल्यानंतर ११ च्या रात्री पोलीस स्टेशनला झालेल्या तक्रारीवरून काही हमालांना याबाबत विचारणा केली. याचे पडसाद बाजार समितीमधील मोजाईवर झाले व हमालांनी मोजणीचे काम सोडून संप केल्याने बाजार समिती व नाफेडची खरेदी पुन्हा ठप्प पडली. त्यामुळे निराश झालेल्या काही शेतकऱ्यांना त्यांचा माल परत घेऊन जाण्याचा नाहक त्रास सोसावा लागला.
एफसीआयची बाजार समितीमधील तूर खरेदी सुरुवातीपासून वादांकित झाली आहे. यापूर्वी ३ मार्चला काही व्यापाऱ्यांचा माल खरेदी होत असल्याचा आरोप झाल्याने काही तुरीचा शेतमाल सील करण्यात आला होता. त्यानंतर बारदाना नसल्याने खरेदी बंदच होती. त्यानंतर पाच दिवसांपूर्वी खरेदी सुरू झाली व ११ एप्रिलच्या रात्री काही हमालांनी रात्रीच्या अंधारात एफसीआयच्या पोत्यांमध्ये निकृष्ट दर्जाची तूर भरणे सुरू केल्याने त्यांना शेतकऱ्यांनी रंगेहात पकडले व आंदोलन केले. त्यानंतर बाजार समितीचे सचिव भगत यांनी रात्री विना परवाना माल मोजणाऱ्या हमालांविरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रार दिल्याने पोलिसांनी संबंधित हमालांची चौकशी केली. त्यामुळे याचा विरोध करण्यासाठी १३ एप्रिलला दुपारी बाजार समिती आवारातील धान्य मोजणी बंद करून संप सुरू केला. त्यामुळे बाजार समिती यार्डातील हर्रासी बंद पाडल्याने अनेक शेतकऱ्यांना त्यांचा माल परत घरी न्यावा लागल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यापूर्वी बारदाना व खरेदीतील गौडबंगाल यामुळे बंद तूर खरेदी आता हमालांच्या संपामुळे पुन्हा बंद पडली असून, त्याचबरोबर नियमित हर्रासी सुद्धा बंद झाल्याने बाजार समितीचा कारभार ठप्प झाला आहे.

शेतकऱ्यांना नाहक हेलपाटे
संपाची पूर्वकल्पना नसल्याने शेतकऱ्यांनी सकाळी त्यांचा माल हर्रासीमध्ये टाकला; मात्र हमालांच्या संपामुळे त्याची हर्रासी झालीच नाही. अखेर अनेकांनी तो पुन्हा पोत्यांमध्ये भरून घरी नेला. त्यामुळे या संपाचा नाहक त्रास शेतकऱ्यांना झाला, तरी एफसीआयला तूर विकण्यासाठी मागील पन्नास दिवसांपासून बाजार समितीमध्ये प्रतीक्षा करणाऱ्यांचा पुन्हा हिरमोड झाला.

 

Web Title: Now the purchase of junk for the hamalas collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.