भूसंपादन कायद्याविरोधात आता रस्त्यावर लढाई
By Admin | Updated: March 24, 2015 01:16 IST2015-03-24T01:16:22+5:302015-03-24T01:16:22+5:30
बुलडाण्यात काँग्रेसचा मोर्चा; मुकुल वासनिक यांचा इशारा.

भूसंपादन कायद्याविरोधात आता रस्त्यावर लढाई
बुलडाणा : केंद्रातील भाजप सरकारने जुलमी भूूमिअधिग्रहण कायदा लागू करून शेतकर्यांच्या हक्कावर गदा आणली आहे; मात्र हा कायदा हाणून पाडण्यासाठी काँग्रेसने आता संसदेत व संसदेबाहेर रस्त्यावरची लढाई लढण्याचा निश्चय केला असून, केंद्र सरकारला वठणीवर आणण्यासाठी आता रस्त्यावरच्या लढाईसाठी सज्ज व्हा, असे आवाहन अ. भा. काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक यांनी केले. केंद्र सरकारने भूमिअधिग्रहण कायद्यामध्ये शेतकरी विरोधी तरतुदीचा समावेश केल्यामुळे शेतकर्यांचे हित धोक्यात आले आहे. हा कायदा रद्द करावा, या मागणीसाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने सोमवारी अ.भा.काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढला. टिळक नाट्य क्रीडा मंदिरापासून निघालेल्या या मोर्चात जिल्हाभरातील हजारो काँग्रेस कार्यकर्ते व शेतकरी सहभागी झाले होते. संगम चौक, जयस्तंभ चौक, बाजार लाईन कारंजा चौक मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी मुकुल वासनिक म्हणाले की, काँग्रेस आघाडी प्रणीत तत्कालीन सरकारने भूमिअधिग्रहण कायद्यामध्ये ८0 टक्के जनमताच्या होकाराशिवाय भूमिअधिग्रहण करता येणार नाही, अशी तरतूद केली होती; मात्र भाजप सरकारने भूमिअधिग्रहणासाठी जनमताचा विचार न करता हे कलम काढून टाकले, त्यामुळे हा कायदा संमत झाल्यास शेतकर्यांची शेती भांडवलदारांच्या घशात जाणार आहे. मोदी सरकारचा समाचार घेताना वासनिक म्हणाले की, शे तमालाच्या उत्पादनावर किमान ५0 टक्के नफा गृहीत धरून आधारभूत किमती ठरविल्या जातील, अशा वल्गना नरेंद्र मोदी यांनी केल्या होत्या; मात्र सत्तेवर आल्यानंतर जनतेला दिलेल्या अच्छे दिनचा वादा हे सरकार विसरले आहे. शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्यांच्या जिवावर उठलेल्या या सरकारला धडा शिकविण्यासाठी आता काँग्रेसने ही लढाई सुरू केली असून, शहीद भगतसिंग, राजगुरू यांच्या स्मृ तीदिनापासून गल्लीपासून दिल्लीपर्यंत ही लढाई सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकरी, शे तमजूर, गरीब आदिवासींसाठी काँग्रेसने अनेक योजना सुरू केल्या; मात्र मोदी सरकार सत्तेवर आल्या पासून या सरकारने जनतेच्या योजनांची वाट लावल्याचा आरोप श्याम उमाळकर यांनी केला. शेतकरी शेतमजूर व सर्वसामान्याच्या विरोधात मोदी सरकारने अनेक निर्णय घेतले असून, या सरकारच्या विरोधात आता काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे. हा लढा यापुढेही असाच सुरू राहील, असा इशारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष विजय अंभोरे यांनी दिला. अच्छे दिनचे स्वप्न दाखविणार्या भाजप सरकारने सत्तेवर आल्यानंतर जनतेची दिशाभुल केली. हे सरकार सर्वसामान्य गोरगरिबांच्या विरोधातील असल्याचा आरोप अँड. जयश्री शेळके यांनी केला. आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रास्ताविकातून केंद्र व राज्यातील भाजप सरकारवर सडकून टीका केली. शेवटी आ. राहुल बोंद्रे यांनी आभार मानले. व्यासपीठावर माजी आ. दिलीपकुमार सानंदा, जि. प. अध्यक्ष अलका खंडारे, संजय राठोड, जि.प.चे माजी अध्यक्ष प्रा.नरेंद्र खेडेकर, लक्ष्मणराव घुमरे, बलदेवराव चोपडे, मनोज कायंदे, महिला काँग्रेसच्या अध्यक्ष तब्बसुम हुसेन, अंजली टापरे, मीनल आंबेकर, शहर अध्यक्ष सुनील सपकाळ, दीपक रिंढे, समाधान हेलोडे, सभापती अंकुश वाघ, सभापती गणेश बस्सी, रशिदखा जमादार यांच्यासह काँग्रेसचे नेते उपस्थित होते. मुकुल वासनिक यांच्या नेतृत्वा त जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आ.हर्षवर्धन सपकाळ, आ.राहुल बोंद्रे, माजी आ. दिलीपकुमार सानंदा, जि. प. अध्यक्ष अलका खंडारे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी किरण कुरूंदकर यांच्या मार्फत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व महाराष्ट्राचे राज्यपाल यांना निवेदन देण्यात आले.