निवेदन देणा-यालाच कारवाईची नोटीस
By Admin | Updated: May 29, 2015 00:01 IST2015-05-29T00:01:47+5:302015-05-29T00:01:47+5:30
शेगाव येथील कोतवाल भरती प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप.

निवेदन देणा-यालाच कारवाईची नोटीस
फहीम देशमुख / शेगाव ( जि. बुलडाणा): मागील महिन्यात शेगाव शहर व तालुक्यातील रिक्त असलेल्या कोतवाल पदाच्या निवड प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करून चौकशी करण्याची मागणी करणार्या निवेदनकर्त्यालाच निवड समितीचे सचिव तथा तहसीलदार गणेश पवार यांनी निवेदन का दिले तुमच्या विरुद्ध सरकारी कामात अडथळा घातल्याबाबत कारवाई का करण्यात येवू नये, अशी नोटीस बजावल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
शेगाव शहर व तालुक्यात काही गावांकरिता मागील आठवड्यात कोतवाल पदाची भरती प्रक्रिया पार पडली. यामध्ये अनियमितता झाल्याचा आरोप परीक्षार्थ्यांसह शिवसेनेचे माजी शहरप्रमुख दिनेश शिंदे यांनी निवड समितीचे सचिव तथा तहसीलदार गणेश पवार यांच्याकडे केला. निवड प्रक्रिया सुरू असताना व कार्यालयाने अनेक चुका निकालामध्ये केल्या आहेत. एकाच व्यक्तीला दोन वेळा पात्रसुद्धा दर्शविले आहे. यामुळे या प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला. शिवाय या आरोपाकडे दुर्लक्ष करीत कुठलीही चौकशी न करता निवड समितीने कोतवाल भरती घाईघाईने पूर्ण केली. यामुळे शिंदे यांनी आंदोलनाचा इशारा दिला. दरम्यान, तहसीलदार पवार यांनी निवेदनकर्ते शिंदे यांना नोटीस बजावून आपण निवेदनात आरोप करून सरकारी कामात अडथळा आणल्याने आपल्याविरुद्ध कायदेशीर कारवाई का करण्यात येवू नये, अशी नोटीस बजावली. प्रकरणामध्ये अनियमितता झाल्याने चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी शिंदे यांनी केली आहे. नोटीस निवड समिती अध्यक्षांनी दिली असून, तो प्रक्रियेचा भाग आहे, असे याबाबत तहसीलदार गणेश पवार यांनी सांगितले.