दोन महिन्यांपासून वेतन नाही!
By Admin | Updated: May 30, 2016 02:12 IST2016-05-30T02:12:20+5:302016-05-30T02:12:20+5:30
खामगाव पालिका कर्मचा-यांना महागाई भत्त्याचीही प्रतीक्षा.

दोन महिन्यांपासून वेतन नाही!
खामगाव : नगरपालिकेतील सुमारे ४५0 कर्मचार्यांना गेल्या दोन महिन्यांपासून नियमित वेतन मिळाले नाही, सोबतच या कर्मचार्यांना वाढीव महागाई भत्त्याचीही रक्कम अदा करण्यात आलेली नाही. त्यामुळे दैनंदिन गरजा भागविताना अनेकांच्या नाकीनऊ येत असून, शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने वेतन अदा करण्याची मागणी जोर धरत आहे.
जिल्ह्यातील सर्वात मोठी नगरपालिका म्हणून खामगाव नगरपालिकेचा नावलौकिक आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून खामगाव नगरपालिकेतील प्रशासकीय कामकाज चांगलेच ढेपाळले आहे. खामगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी डी. ई. नामवाड यांना एका कथित प्रकरणात निलंबित करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या रिक्त पदाचा प्रभार नांदुरा नगरपालिकेचे मुख्याधिकारी डी. आर. बोरीकर यांच्याकडे सोपविण्यात आला. त्यांनी खामगाव नगरपालिकेचा प्रभार सांभाळण्यासाठी असर्मथता दर्शविली. त्यामुळे आता खामगाव पालिकेतील नगराध्यक्ष पदाचा प्रभार चिखली नगरपालिकेचे मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. तथापि, मुख्याधिकारी नामवाड यांच्या निलंबनानंतर पालिकेचे प्रशासकीय कामकाज चांगलेच ढेपाळले. प्रभारी मुख्याधिकारी डी. आर. बोरीकर यांनी खामगाव पालिकेला वेळ न दिल्याने, खामगाव पालिकेतील प्रशासकीय आणि वित्तीय बाबींमध्ये तांत्रिक अडचण झाली.
दरम्यान, प्रभारी मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण यांनी पदभार स्वीकारला असला, तरी प्रशासकीय कामकाजाला गती देण्यासाठी त्यांना बराच अवधी द्यावा लागणार आहे. म्हणजेच पालिकेच्या प्रशासकीय कामकाजाची गाडी रुळावर आणण्यासाठी चांगलाच काळ जाऊ द्यावा लागेल. तथापि, या काळात पालिकेतील आर्थिक व्यवहार ठप्प झाले असून, गेल्या दोन महिन्यांपासून पालिकेतील सर्वच कर्मचार्यांचे वेतन रखडले आहे. त्यामुळे या कर्मचार्यांना आपल्या दैनदिन गरजा भागविताना चांगलीच दमछाक करावी लागत आहे.