No Electric audit of Khamgaon sub-district hospital | खामगाव उपजिल्हा रुग्णालयाच्या इलेक्ट्रिक ऑडिटला खो

खामगाव उपजिल्हा रुग्णालयाच्या इलेक्ट्रिक ऑडिटला खो

लोकमत न्यूज नेटवर्क 
खामगाव : स्थानिक उपजिल्हा रुग्णालयातील इलेक्ट्रिक ऑडिटकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. गत दोन वर्षांपासून रुग्णालयातील ऑडिटकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याची धक्कादायक वस्तुस्थिती समोर येत आहे. दरम्यान, रुग्णालयाचे फायर ऑडिट करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग (विद्युत) अमरावती यांच्याशी उपजिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाने पत्रव्यवहार करण्यात आल्याचेही ‘लोकमत’च्या पाहणीत समोर आले आहे.
 सामान्य रुग्णालयातील इलेक्ट्रिक ऑडिटकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे गत अनेक वर्षांपासून कानाडोळा असल्याचे उपजिल्हा सामान्य रुग्णालयातील पत्रव्यवहारावरून दिसून येते. विद्युत देखभाल दुरुस्तीकडेही संबंधितांचे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे. रुग्णालयात विद्युत वायर सुस्थितीत असल्यातरी डाटा केबल लोंबकळलेल्या अवस्थेत असल्याचे चित्र आहे. 

पाहणीत काय आढळले ?
खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयातील सर्वच वाॅर्डातील इलेक्ट्रिक वायरची फिटिंग सुस्थितीत असल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत आढळून आलेे. दरम्यान, रुग्णालयातील विविध वाॅर्डासाठी ३५ फायर एक्स्टिंग्यूसेर आहेत. हे सुस्थितीत असले तरी, फायर अलार्म सिस्टीमचा रुग्णालयात अभाव आहे.

ऑडीट न करण्यास जबाबदार कोण ?
 उपजिल्हा सामान्य रुग्णालयात इलेक्ट्रिक ऑडिट करण्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग (विद्युत) अमरावती यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून इलेक्ट्रिक ऑडिट अद्यापही करण्यात आलेले नाही.

खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयातील इलेक्ट्रिक वायर सद्य:स्थितीत चांगल्या आहेत. शॉर्टसर्किटसंदर्भात कोणताही अपघात अद्याप येथे घडलेला नाही. रुग्णालयात फायर ऑडिटसंदर्भात अमरावती येथील सा.बां. विभाग (विद्युत) यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. 
- डाॅ.निलेश टापरे,
निवासी वैद्यकीय, अधिकारी, खामगाव

Web Title: No Electric audit of Khamgaon sub-district hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.