कोऱ्हाळा येथील सरपंचाविरुद्ध अविश्वास प्रस्ताव पारित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:32 IST2021-02-05T08:32:32+5:302021-02-05T08:32:32+5:30
तालुक्यातील कोऱ्हाळा ग्रामपंचायतमध्ये एक सरपंच व नऊ सदस्य संख्या असून, यातील एक सदस्य पद रिक्त आहे. सरपंच श्रीकृष्ण सुपडा ...

कोऱ्हाळा येथील सरपंचाविरुद्ध अविश्वास प्रस्ताव पारित
तालुक्यातील कोऱ्हाळा ग्रामपंचायतमध्ये एक सरपंच व नऊ सदस्य संख्या असून, यातील एक सदस्य पद रिक्त आहे. सरपंच श्रीकृष्ण सुपडा सोनोने यांची जनतेतून सरपंचपदी निवड झाली होती. दरम्यान, येथील सात सदस्यांनी सरपंच श्रीकृष्ण सोनोने यांच्याविरुद्ध गुरुवारी मोताळा तहसीलदारांकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. सरपंच श्रीकृष्ण सोनोने हे विकासकामात सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करतात. महिला सदस्यांना विश्वासात न घेता अधिकारांचा दुरुपयोग करतात आदी कारणे अविश्वास प्रस्तावात नमूद होती. या अविश्वास प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी तहसीलदार तथा अध्यासी अधिकारी एस. एम. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी कोऱ्हाळा ग्रामपंचायतमध्ये विशेष सभा घेण्यात आली. यावेळी सरपंच व आठ सदस्य हजर होते. अविश्वास प्रस्तावावर चर्चेनंतर मतदान घेण्यात आले. यावेळी ग्रा. पं. सदस्य संगीता गजानन बोडखे, गजानन बच्छे, गणेश टेकाडे, नंदाबाई बांगर, सयाबाई इंगळे, सीमा तायडे, इंदूबाई वाघ या सात सदस्यांनी हातवर करून अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने मत नोंदविले. सरपंच श्रीकृष्ण सोनुने व सदस्य पुष्पा गजानन घोराडे या दोघांनी सरपंच सोनूने यांच्या बाजूने मत नोंदविले. यावरून अध्यासी अधिकारी तथा तहसीलदार चव्हाण यांनी सरपंच सोनूने यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव पारित झाल्याचे घोषित केले. यावेळी तहसीलदारांना ग्रामसेवक एस. पी. जाधव यांनी सहकार्य केले. सरपंच श्रीकृष्ण सोनोने यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव पारित झाला असून, आता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने ग्रामसभा बोलावण्यात येणार आहे. तोपर्यंत सरपंचपदी सोनूने कायम राहणार आहेत. ग्रामसभेत गावातील मतदारांनी सरपंचावरील अविश्वास प्रस्तावाला बहुमताने मान्यता दिल्यानंतर सरपंच सोनोने यांना सरपंच पदावरून पायउतार व्हावे लागेल.