चोरांच्या भीतीने नागरिक घालतात रात्रीची गस्त
By Admin | Updated: April 10, 2015 02:31 IST2015-04-10T02:31:13+5:302015-04-10T02:31:13+5:30
पोलीस यंत्रणा सुस्त; बुलडाणानजीकच्या सागवन परिसरात घरफोड्यांचे सत्र.

चोरांच्या भीतीने नागरिक घालतात रात्रीची गस्त
बुलडाणा : मागील आठवड्यात चड्डी-बनियन टोळीने बुलडाणा शहरात धुडगूस घालून नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली होती. चार दिवसांत जवळपास १२ कुलुपे उघडून चोर्या केल्या व लाखोंचा ऐवज पळविला. याचा पोलीस यंत्रणेवर कोणताही परिणाम झाला नसल्याने आता नागरिकच स्वत:ची सुरक्षा करीत आहेत. शहराच्या दक्षिणेकडील सागवन परिसरात राहणार्या लोकांनी आता रात्रभर गस्त घालणे सुरू केले आहे. दरवर्षी मार्च, एप्रिल महिन्यातील उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये जबरी चोर्या, घरफोड्या व दरोड्याच्या घटना घडत असतात. अशावेळी पोलीस यंत्रणा सतर्क राहून लोकांच्या जीविताची व मालमत्तेची सुरक्षा करते. अर्थात हे काम एकट्या पोलीस यंत्रणेचे नसुन यासाठी नागरिकांचेसुद्धा सहकार्य आवश्यक असते. पोलिसांना चोर्या, घरफोड्यांची वारंवार माहिती देऊनही त्यांच्याकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. परिणामी लोकांना स्वत:च सुरक्षेबाबत दक्ष राहावे लागत आहे.