दुष्काळजन्य परिस्थितीत ‘निंबोळी’चा आधार

By Admin | Updated: July 15, 2015 23:26 IST2015-07-15T23:26:27+5:302015-07-15T23:26:27+5:30

निंबोळी वेचणी जोमात; खामगाव बाजार समितीत आवक वाढली.

'NeemBoli' basis in drought conditions | दुष्काळजन्य परिस्थितीत ‘निंबोळी’चा आधार

दुष्काळजन्य परिस्थितीत ‘निंबोळी’चा आधार

नाना हिवराळे / खामगाव : पावसाने दडी मारल्याने ग्रामीण भागातील वातावरण मरणासन्न झाले आहे. पेरणी करून उगवलेली पिके तापत्या उन्हाने करपली आहेत. शेतकरी संकटात असताना मजुरांनाही रोजगार नाही. अशा बिकट स्थितीत ग्रामीण भागात निंबोळी वेचून मजूरवर्ग उदरनिर्वाह चालवत असल्याचे चित्र आहे. दुष्काळजन्य परिस्थितीत मजुरांना निंबोळी आधार ठरली आहे. अपुर्‍या पावसामुळे शेती करणे शेतकर्‍यांसाठी धोकादायक ठरत आहे. समाधानकारक पाऊस झाल्यास मशागतीच्या कामांना वेग येतो. यावर्षीच्या खरीप हंगामात पेरण्या उत्स्फूर्त झाल्या; मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली. २0 दिवसांपेक्षा जास्त कालावधी लोटूनही पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे शेतीच्या पेरणीपश्‍चात मशागतीची कामे ठप्प आहेत. परिणामी मजुरांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. एरवी पेरणीनंतर गावात एकही नागरिक रिकामा फिरताना दिसत नाही; मात्र निसर्गाच्या दुष्टचक्राने परिस्थिती विपरीत झाली आहे. मजुरांच्या हाताला काम नसल्यामुळे ते गावातच आढळून येतात. डवरे वा निंदणाची कामे ठप्प असल्याने मजुरांनी निंबोळी वेचण्यावर भर दिला आहे. महिला मजूर मुलाबाळांना सोबत घेऊन दिवसभर निंबोळ्या वेचण्याचे काम करीत असल्याचे चित्र दिसून येते. दिवसभरात एक महिला १५ ते २0 किलो निंबोळी वेचते. गावातीलच किरकोळ व्यापारी पाच ते सहा रुपये प्रतिकिलो दराने त्या निंबोळ्या विकत घेत आहेत. निंबोळी विकून ८0 ते १00 रुपये मजुरी मिळत असल्याचे चित्र आहे. निंबोळी वेचणीचा हंगाम जोमात सुरू असल्याने खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात निंबोळीची आवक मागील आठ ते दहा दिवसांपासून वाढली आहे. बाजारात ८00 रुपयांपासून तर ११00 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत असल्याने किरकोळ व्यापार्‍यांना परवडत आहे. सद्यस्थितीत पाऊस नसल्याने ग्रामीण भागात निंबोळी वेचणे हाच मुख्य व्यवसाय बनल्याने पाऊस येईपर्यंंत त्यावरच मजूरवर्गाला गुजराण करावी लागणार आहे. खामगाव बाजार समितीत निंबोळीची खरेदी केल्यानंतर एमआयडीसी भागात असलेल्या प्रक्रिया उद्योगात त्या आणल्या जातात. तेथे निंबोळीपासून पावडर व जैवित खत बनविले जात असल्याने निंबोळीचे भाव वाढल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: 'NeemBoli' basis in drought conditions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.