शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती देण्याची गरज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2017 00:33 IST2017-04-14T00:31:19+5:302017-04-14T00:33:55+5:30

लोकमत परिचर्चेतील सूर : शासनाच्या चुकीच्या धोरणामुळेच शेतकरी कर्जबाजारी

The need to pay the farmers totally debt relief! | शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती देण्याची गरज!

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती देण्याची गरज!

बुलडाणा : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शेतकऱ्यांची बिकट अवस्था झाली आहे. चांगले उत्पादन होऊन दोन पैसे हाती येथील, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी शेती केली. यासाठी काहींनी कर्ज काढले; परंतु शेतमाल आल्यानंतर भाव पडल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. याबाबत शासनाने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी, असा सूर लोकमततर्फे मंगळवारी शेतकऱ्यांना सरकारने कोणत्या प्रकारे कर्जमाफी द्यावी? या विषयावर आयोजित परिचर्चेत उमटला.
शेतकरी मोठ्या अपेक्षेने दरवर्षी शेती करतो, यासाठी विविध बँकांकडून कर्ज काढतो; मात्र कधी निसर्ग दगा देतो, कधी शासनाच्या धोरणाचा फटका बसतो, तर कधी व्यापारी अडवणूक करतो. शेतकऱ्यांसाठी विविध प्रतिबंध लागण्यात आले आहेत. त्याच्या मालास तालुकाबंदी, जिल्हाबंदी लावण्यात आली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना जास्त भाव मिळणाऱ्या बाजारपेठेत आपला माल विकता येत नाही. परिणामी, जवळच्या बाजारात किंवा व्यापाऱ्याला माल विकावा लागतो. त्याचा व्यापारी गैरफायदा घेतात. यावर्षीही शेतकऱ्यांचा माल घरात आल्यानंतर बाजारातील भाव कमी झाले. शासनाने हमीभाव कमी जाहीर केला. त्यामुळे कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याला मिळेल त्या भावाने माल विकावा लागला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे कर्ज वाढत आहे. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती मिळावी, यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आदी मित्रपक्षांच्यावतीने संघर्ष यात्रा काढण्यात येत आहे, तर शिवसेना १३ एप्रिल रोजी एकदिवशीय धरणे आंदोलन करणार आहे. शेतकरी लहान असो किंवा मोठा त्याने शेतीसाठी कर्ज काढले असेल, ते संपूर्ण माफ करावे, अशा प्रतिक्रिया परिचर्चेत सहभागी मान्यवरांनी व्यक्त केल्या.

शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. इतर वस्तूंच्या तुलनेत शेतकऱ्यांच्या शेती उत्पादनाला भाव मिळत नाही. काही वर्षापूर्वी तसेच आताचे कर्मचारी पगार, सोन्याचे भाव व कापसाचे भाव यात मोठ्या प्रमाणात तफावत निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती देणे आवश्यक आहे. शासन कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करून कायमचा बोजा आपल्यावर घेण्यास तयार आहे, तर शेतकऱ्यांना कर्जमुक्ती का नाही, याबाबत शासनाने विचार करून त्वरित कर्जमुक्ती द्यावी.
-डॉ.विनायक वाघ, सचिव, जिल्हाध्यक्ष,स्वाभिमानी संघटना, बुलडाणा.

शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणे अत्यंत आवश्यक आहे. मागिल सरकारने कर्जमाफी केली, पण फायदा झाला घोटाळा करून बुडालेल्या बँकांचा. म्हणून तसे न करता वर्षभर वसुली थांबवावी. आता जन-धनच्या सरळ लिंकमुळे नवीन कर्ज वाटप गरीब शेतकऱ्यांच्या खात्यात वळती करावे. ग्रामीण भागातील लहान शेतकऱ्यांची गंभीर अवस्था आहे. अनेकांनी कर्ज काढून शेतीची पेरणी केली होती, यावर्षी पिकेही चांगली आली; परंतु शेतकऱ्यांच्या घरात शेतमाल आल्यानंतर बाजारातील भाव पडले. शेवटी नाइलाजाने शेतकऱ्यांना माल विकावा लागला. त्याचा फायदा व्यापाऱ्यांना झाला.
-पंडितराव सपकाळ, शेतकरी उमाळा ता.बुलडाणा.

शेतकऱ्यांवरील कर्ज व त्याच्या शेतमालास भाव न मिळणे यास सर्वस्वी शासनाचे ध्येयधोरण जबाबदार आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. यासाठी प्रथम शासनाने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देऊन त्यांच्या शेतमालास भाव कसा मिळेल,यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांचा माल जेव्हा घरात येतो, तेव्हा बाजारातील भाव कमी झालेले असतात. शेतकऱ्यांजवळ पैसा नसल्यामुळे व कर्ज भरण्यासाठी त्याला माल विकण्याशिवाय पर्याय नसतो.
-सुरेशदादा सोनुने, जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना, बुलडाणा.

शासन शेतकऱ्यांना हमी भाव देत नाही, त्यामुळे शेतकरी उत्पादनाला अल्प भाव मिळत असून, उत्पादन खर्चही काढणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकरी कुटुंबात तणाव वाढला असून, शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या संख्येत वाढ होत आहे.यास सर्वस्वी शासन जबाबदार असून शेतकऱ्यांच्या हितासाठी संपूर्ण कर्जमुक्ती देणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना पाच वर्षातून एक वर्ष चांगले येते; मात्र कर्ज वाढत असल्यास शेतकऱ्यांना विविध अडचणी येतात. त्यांना संपूर्ण कर्जमुक्ती दिल्सास काही प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. त्यांना पुढील हंगामात शेती तयार करण्यासाठी, पेरण्यासाठी मदत होईल.
-महेंद्र बोर्डे, प्रसिद्धी प्रमुख,जिल्हा काँग्रेस समिती, बुलडाणा.

शेतकऱ्यांसह सर्वांना संपूर्ण कर्जमुक्ती मिळाली पाहिजे; मात्र या ठिकाणी तो खरोखरच शेतकरी आहे का, त्याने शेतीसाठी किती कर्ज घेतले, याबाबत चौकशी करून कर्जबाजारी शेतकऱ्याला न्याय दिला पाहिजे. अनेकदा शेतकऱ्यांच्या नावावर उद्योगासाठी कर्ज घेतल्याची उदाहरणे आहेत. त्या उद्योगाचे कर्ज थकलेले असते; मात्र शेतकरी बदनाम होत असतो. याबाबत चौकशी करून शेतीसाठी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यास संपूर्ण कर्ज माफी देऊन त्यांच्या शेतमालास भाव देण्याची गरज आहे.
- सुमंत इंगळे, शिवसेना सर्कल प्रमुख,साखळी बु.,बुलडाणा.

Web Title: The need to pay the farmers totally debt relief!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.