१४२ ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रीय स्वच्छता अभियान
By Admin | Updated: September 26, 2014 00:03 IST2014-09-26T00:03:18+5:302014-09-26T00:03:18+5:30
बुलडाणा जिल्ह्यात स्वच्छतेबाबत प्रबोधन आणि नवीन उपक्रमांचा समावेश.

१४२ ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रीय स्वच्छता अभियान
बुलडाणा : राष्ट्रीय स्तरावरून ग्रामीण स्वच्छतेच्या निर्मल भारत अभियानाची अंमलबजावणी २ ऑक्टोबर २0१९ पर्यंत पूर्ण करण्यासाठी मिशन स्वच्छ भारत या नावाने प्रकल्प सुरू होत आहे. या प्रकल्पाची सुरुवात प्रभावीपणे होण्यासाठी केंद्र सरकारने २५ सप्टेंबर ते २३ ऑक्टोबर २0१४ दरम्यान व्यापक जनजागृती होण्यासाठी जिल्ह्यातील १४२ ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रीय स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी व्ही.व्ही. यादव यांनी दिली.
राष्ट्रीय स्वच्छता अभियानात जिल्ह्यातील १४२ ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत प्रत्यक्ष गृहभेट देऊन शौचालय नसलेल्या कुटुंबांना शौचालय बांधकाम व वापरासाठी प्रवृत्त करणे, शाळांमध्ये पर्याप्त प्रमाणात मुला-मुलींसाठी स्वच्छता गृहांची उपलब्ध, हात धुण्याचे महत्त्व, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन व परिसर स्वच्छता, लहान मुलांच्या विष्ठेचे व्यवस्थापन, पिण्याच्या पाण्याची सुरक्षित हाताळणी व साठा या बाबींवर लक्ष केंद्रित करून याबाबत ग्रामस्तरावर जनजागृती करण्यात येणार आहे.
नावीन्यपूर्ण उपक्रमांमध्ये निवडलेल्या ग्रामपंचायतीत २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीनिमित्त होणार्या ग्रामसभेत या अभियानाबद्दल आणि स्वच्छता विषयावर प्राधान्याने माहिती देण्यात येणार आहे. गावातील भजनी मंडळ, महिला मंडळ, महिला स्वयंसहाय्यता बचत गट, युवक मंडळ इत्यादींच्या बैठका घेऊन वॉर्डनिहाय उद्दिष्टपूर्ती करण्यासाठी नियोजन करण्यात येणार आहे. तसेच तालुकानिहाय प्रत्येकी ५ ग्रामपंचायतींचा समुदाय संचलित हागणदारीमुक्त गाव सूक्ष्म कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्वच्छता विषयक स्पर्धेचे आयोजन करणे, कुटुंब संपर्क अभियान आदी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे.
अभियान कालावधीत प्रथम शौचालयाचे बांधकाम सुरू करणार्या ग्रामपंचायत स्तरावरील कुटुंबाचा सत्कार गावस्तरावर करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त प्रभावी गृहभेटी देणार्या पंचायत समितीस्तरावर कार्यरत गट समन्वयक, समूह समन्वयक यांचासुद्धा सन्मान जिल्हास्तरावर करण्यात येणार आहे.