नराधम बापाने चिमुरड्याला गरम तव्यावर उभे केले
By Admin | Updated: May 4, 2015 01:18 IST2015-05-04T01:18:10+5:302015-05-04T01:18:10+5:30
पित्याविरुद्ध आईची बुलडाणा पोलिसात तक्रार

नराधम बापाने चिमुरड्याला गरम तव्यावर उभे केले
बुलडाणा : एका निर्दयी पित्याने स्वत:च्या एक वर्षीय मुलाला गरम तव्यावर उभे केले. यामुळे बालकाच्या पायाच्या तळव्याला गंभीर दुखापत झाली. ही घटना पाच दिवसांपूर्वी औरंगाबाद येथील वाळुज एमआयडीसी परिक्षेत्रात घडली. या प्रकरणी मुलाच्या आईने ३ मे रोजी बुलडाणा पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीच्या आधारे या निर्दयी पित्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
बुलडाणा येथील रुपाली विष्णू खरात हिचा विवाह ३ वर्षांपूर्वी जालना जिल्ह्यातील बेलोरा येथील सुनील हिंमतराव भोसले यांच्याशी विवाह झाला. तो वाळुज एमआयडीसीमध्ये एका हॉटलमध्ये काम करीत होता. त्यामुळे लग्नानंतर सुनील भोसले पत्नी रुपाली सोबत औरंगाबाद येथील वाळुज येथे स्थायिक झाला; मात्र सुनीलला दारूचे व्यसन असल्यामुळे तो पत्नी रु पलीला नेहमीच मारहाण करीत होता.
या दरम्यान २८ एप्रिल रोजी रुपाली आपल्या एक वर्षाचा मुलगा शिवराज याला पती सुनीलकडे ठेवून शौचास केली. यावेळी दारूच्या नशेत सुनीलने शिवराजला घरातील गरम तव्यावर उभे केले. वेदनेमुळे शिवराजचा जोरजोराने रडण्याचा आवाज ऐकून रुपाली घरी आली. ती घरी आल्याचे पाहून सुनीलने तेथून पळ काढला. या प्रकारानंतर रुपाली बुलडाणा येथे माहेरी आली. दरम्यान, ३ मे रोजी बुलडाणा पोलीस स्टेशनला तिने पती विरुद्ध तक्रार दिली. या आधारे पोलिसांनी सुनलि हिंमतराव भोसले याच्यावर गुन्हा दाखल केला. या संदर्भात अद्याप पोलिसांनी कारवाईला प्रारंभ केला नव्हता.