वाटाघाटीच्या नावाखाली संमतीपत्र घेण्याचा घाट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2017 01:13 IST2017-07-10T01:13:31+5:302017-07-10T01:13:31+5:30
समृद्धी महामार्गाला विरोध कायम : भूसंपादन कायद्याने जमिनी देण्यावर शेतकरी ठाम

वाटाघाटीच्या नावाखाली संमतीपत्र घेण्याचा घाट!
ब्रह्मानंद जाधव ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्याकरिता सुरुवातीला भूसंचनाचा प्रयोग राबविण्यात आला; मात्र आता वाटाघाटीच्या नावाखाली शेतकऱ्यांचे संमतीपत्र घेण्याचा घाट सुरू असल्याचे दिसून येते; परंतु यालाही शेतकऱ्यांचा विरोध कायम असून, भूसंपादन कायदा २०१३ चे सर्व कलम लागू केल्यासच जमिनी देण्यात येतील, यावर समृद्धी महामार्गविरोधी शेतकरी संघर्ष समिती ठाम आहे.
नागपूर ते मुंबई हा समृद्धी महामार्ग बुलडाणा जिल्ह्यातून ८७.२९० किलोमीटर अंतराचा जात आहे. त्यामध्ये मेहकर, लोणार, सिंदखेड राजा व देऊळगाव राजा या तीन तालुक्यांतील हजारो हेक्टर शेतजमीन जात आहे. या समृद्धी महामार्गासाठी आवश्यक असणाऱ्या जमीन घेण्याकरिता सुरुवातीला शासनाने भूसंचनाचा प्रयोग जिल्ह्यात राबविला. मात्र, भूसंचनानुसार शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीचे संमतीपत्र दिले नाही. त्यामुळे आता वाटाघाटी करण्यासाठी शेतकऱ्यांना जमिनीचे संमतीपत्र मागण्यात येत आहेत. शासनाने वाटाघाटीसाठी दर जाहीर केले आहेत. परंतु वाटाघाटीसाठी आधी संमतीपत्र द्या, नंतर वाटाघाटी करुन खरेदी करू, असे आदेश आहेत. एकदा जमिनीचे संमतीपत्र दिल्यावर जमिनीचा योग्य मोबदला न मिळाल्यास न्यायालयातसुद्धा दाद मागता येणार नाही, यामुळे वाटाघाटीसाठी संमतीपत्र देण्यास समृद्धी महामार्ग संघर्ष समितीचा विरोध आहे. तसेच समृद्धी महामार्गासाठी जमिनी घ्यायच्या असतील, तर भूसंपादन कायदा २०१३ च्या सर्व कलमान्वये भूसंपादन करावे, तरच जमिनी देण्यात येतील, यावर शेतकरी ठाम आहेत. भूसंपादन कायदा २०१३ मध्ये मुलांना नोकरी देणे, ७० टक्के संमती घेणे, प्रकल्पात थेट भागीदारी देणे, बाजारभावापेक्षा अनेक पटींनी भरपाई देणे, यासारखे अनेक लाभ असल्याने यातील सर्व कलमांचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात यावा, तरच जमिनी देण्यात येतील, या भूमिकेवर शेतकरी तटस्थ आहेत. त्यामुळे शासकीय अधिकाऱ्यांना समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांचे संमतीपत्र मिळविणे अवघड झाले आहे.
ग्रामपंचायतला लागले वाटाघाटीचे पत्र
बुलडाणा जिल्ह्यातील ज्या गावांची शेती समृद्धी महामार्गात जात आहे, त्या गावांच्या ग्रामपंचायतध्ये समृद्धी महामार्गासाठी जमिनी घेण्याकरिता वाटाघाटी करण्यात येणार असल्याचे पत्र लावण्यात आले आहे. सदर पत्रावर वाटाघाटीसाठी शेतकऱ्यांनी उपविभागीय कार्यालयात आपल्या जमिनीचे संमतीपत्र द्यावे, ठरलेल्या दरानुसार जमिनी खरेदी करण्यात येतील, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच जाहीर करण्यात आलेल्या दरपत्रकामध्ये कमी-जास्त प्रमाणात बदल होऊ शकतो, असे नमूद करण्यात आल्याने शेतकरी संभ्रमात आहेत.
जिल्ह्यात दोन ठिकाणी होणार ‘टाउनशिप’
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर येणाऱ्या बुलडाणा जिल्ह्यामध्ये दोन ठिकाणी ‘टाउनशिप’ होणार आहे. बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा व देऊळगाव राजा तालुक्यातील सावरगाव माळ, निमखेड, गोळेगाव या गावांचा समावेश आहे. तसेच मेहकर तालुक्यातील गवंढाळा, साबरा, फैजलपूर आणि उमरा ही गावे मिळून टाउनशिप बनणार आहे.