चिखली पालिका सभागृहाला भगवानदास गुप्त यांचे नाव !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:31 IST2021-02-05T08:31:48+5:302021-02-05T08:31:48+5:30

चिखली : नगरपालिकेच्या सभांचे कामकाज ज्या मुख्य सभागृहात पार पडते व सर्व सभांचे आयोजन केले जाते, त्या सभागृहास ‘स्व. ...

Name of Bhagwandas Gupta to Chikhali Municipal Hall! | चिखली पालिका सभागृहाला भगवानदास गुप्त यांचे नाव !

चिखली पालिका सभागृहाला भगवानदास गुप्त यांचे नाव !

चिखली : नगरपालिकेच्या सभांचे कामकाज ज्या मुख्य सभागृहात पार पडते व सर्व सभांचे आयोजन केले जाते, त्या सभागृहास ‘स्व. भगवानदासजी गुप्त सभागृह’ असे नामकरण करण्याचा ठराव पालिकेच्या मासिक सभेत २७ जानेवारी रोजी सर्वानुमते मंजूर करण्यात आला. नगरसेवक गोविंद देव्हडे यांनी याबाबत मागणी केली होती.

भाजपचे नगरसेवक व माजी सभापती गोविंद रामदास देव्हडे यांनी ३ नोव्हेंबर २०२० रोजी एका अर्जाद्वारे नगरपालिका सभागृहास स्व. भगवानदासजी गुप्त यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी केली होती. या मागणीवर आजच्या सभेत विचार करण्यात आला. स्व. भगवानदास गुप्त यांनी शिक्षण, सहकार, सामाजिक आणि कृषी आदी वेगवेगळ्या क्षेत्रांत केलेली भरीव व उल्लेखनीय कामगिरी पाहता त्यांच्या नावाचा प्रस्ताव अविरोधपणे सर्वपक्षीय सदस्यांनी मंजूर केला. स्व. भगवानदास गुप्त यांचे कार्य चिखलीकरांसाठी अभिमानास्पद असल्याची प्रतिक्रिया गोविंद देव्हडे यांनी यासंदर्भात व्यक्त केली. शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आणि चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष म्हणून स्व. भगवानदासजी गुप्त उपाख्य लालाजी यांनी काम पाहिले तसेच स्वातंत्र्यपूर्व काळात चिखली नगरपालिकेचे सदस्य म्हणूनही आपले योगदान दिले आहे. त्यांनी चिखली परिसरात शिक्षण आणि सहकारी बँकेचे समृद्ध दालन उघडले. शिक्षण प्रसारक मंडळाच्या अनेक शाळा व महाविद्यालये आज चिखली, बुलडाणा, देऊळगाव राजा आणि सिंदखेड राजा तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवत आहेत. याशिवाय चिखली अर्बन बँकेच्या माध्यमातून विदर्भ आणि मराठवाड्यासह नाशिक जिल्ह्यात हजारो सर्वसामान्य लोकांना आर्थिक मदतीचा हात पुढे केला जातो आहे. स्व. गुप्त यांच्या या असामान्य कर्तृत्वाची आठवण चिखलीकरांना सदैव राहावी व त्यांच्या कार्याचा योग्य तो सन्मान व्हावा या उद्देशाने आपण ही मागणी केली होती, असे ते म्हणाले. आपल्या मागणीची लवकरात लवकर दखल घेऊन स्व. भगवानदास गुप्त यांचे नाव पालिका सभागृहाला देण्याचा ठराव एकमताने मंजूर केल्याबद्दल या प्रस्तावाचे सूचक गोविंद देव्हडे यांनी नगराध्यक्षा प्रिया बोंद्रे व सर्वपक्षीय नगरसेवकांप्रति कृतज्ञता व्यक्त केली आहे.

Web Title: Name of Bhagwandas Gupta to Chikhali Municipal Hall!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.