नगराध्यक्ष रावळ यांचे जॅकवेलवर उपोषण
By Admin | Updated: April 20, 2017 01:21 IST2017-04-20T01:21:50+5:302017-04-20T01:21:50+5:30
मलकापूर : पूर्णा नदीपात्रात अवैधरीत्या बोट टाकून रेती उपसा होत असल्याने या बोटीतून निघणाऱ्या डीझेलमुळे नदीपात्रातील पाणी दूषित होत आहे.

नगराध्यक्ष रावळ यांचे जॅकवेलवर उपोषण
मलकापूर : पूर्णा नदीपात्रात अवैधरीत्या बोट टाकून रेती उपसा होत असल्याने या बोटीतून निघणाऱ्या डीझेलमुळे नदीपात्रातील पाणी दूषित होत आहे. या दूषित पाण्यामुळे शहरवासीयांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. याबाबत जळगाव व बुलडाणा जिल्हाधिकारी यांना निवेदने देऊनही कार्यवाही न झाल्याने नगराध्यक्ष अॅड.हरीश रावळ यांनी आज पूर्णामायीच्या नदीपात्रातील जॅकवेलवर आमरण उपोषण सुरू केले.
मलकापूर शहराला श्री क्षेत्र धुपेश्वर येथून पूर्णा नदीपात्रातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येतो; मात्र गत महिनाभरापासून याच पूर्णा नदीपात्रात उपसा विहिरीजवळ रेती माफीयांनी नदीपात्रात मोठी बोट टाकून रेतीचा अवैधरीत्या उपसा चालविला आहे. या बोटीद्वारे विषारी धूर, द्रव्य तसेच डीझेल पाण्यात मिसळून या द्रव्याचा थर पाण्यावर तरंगताना दिसतो.
हेच पाणी पाइपलाइनद्वारे शहरातील पाणी पुरवठा विभागातील जलशुद्धीकरण केंद्रावर शुद्धीकरण केले जाते; परंतु तरीही या पाण्याचे पाहिजे त्या प्रमाणात शुद्धीकरण होत नाही. त्यामुळे या पाण्याची दुर्गंधी येते व हेच दुर्गंधीयुक्त पाणी शहरवासीयांना प्यावे लागत असल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात येऊन त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. आपल्या न्याय्य मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी नगराध्यक्ष रावळ यांनी जॅकवेलवर उपोषण छेडले आहे. या आंदोलनात नगराध्यक्ष अॅड हरीश रावळ, नगर परिषद उपाध्यक्ष हाजी रशिदखा जमादार, नगर परिषद भाराकाँ गटनेते राजेंद्र वाडेकर, माजी नगराध्यक्ष नारायणदास निहलानी, पाणी पुरवठा सभापती अनिल गांधी, शहराध्यक्ष तथा आरोग्य सभापती राजू पाटील, ज्येष्ठ नगरसेवक अनिल जैस्वाल, नगरसेवक जाकीर मेमन, गजानन ठोसर, अनिल बगाडे, अशोक जाजू, सुनील बगाडे यासह आदींनी भेटी देऊन त्यांच्या या उपोषणाला पाठिंबा दर्शविला आहे.