नाफेड केंद्रावर अनागोंदी कारभार

By Admin | Updated: March 22, 2017 01:53 IST2017-03-22T01:53:25+5:302017-03-22T01:53:25+5:30

५७ टोकन रद्द; व्यापा-यांना दिलेल्या टोकनाविरोधात शेतकरी पोलिसात.

Nafed center chaos management | नाफेड केंद्रावर अनागोंदी कारभार

नाफेड केंद्रावर अनागोंदी कारभार

शेगाव, दि. २१- नाफेडच्या तूर खरेदी केंद्रवारील अनागोंदी कारभाराविरोधात शेतकर्‍यांनी मंगळवारी आवाज उठविला. शेतकर्‍यांचा तुरीचा माल जैसे थे पडून असताना व्यापार्‍यांच्या आलेल्या मालाला टोकन दिल्या जात असल्याचा आरोप करीत शेतकरी पोलीस स्टेशनला दाखल झाले. त्यामुळे शेगावातील तूर खरेदी केंद्रावर तणावाचे वातावरण निर्माण झाले.
शेगाव येथील खामगाव रोडवरील स्व. गजाननदादा पाटील मार्केट यार्डमध्ये शासनाच्या नाफेड केंद्रामार्फत तूर खरेदी सुरू आहे. खरेदी-विक्री संस्था आणि कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या देखरेखीखाली तूर खरेदीची प्रक्रिया सुरू आहे; मात्र मागील २0 ते २५ दिवसांपासून नंबर लावून बाजार समितीच्या आवारात शेतकर्‍यांची तूर पडलेली असताना मागून येणार्‍या व रात्रीच्या वेळात केंद्रात दाखल होणार्‍या तुरीचे मोजमाप लगेच होत असल्याचा आरोप शेतकरी वर्गाकडून केल्या जात आहे. सोमवारी या शेतकर्‍यांनी बाजार समितीचे सचिव पुंडकर यांना घेराव घालत या बाबत जाब विचारला. यावरून समितीने सोमवारी केंद्रात ठेवलेल्या तुरीच्या पोत्यांचा पंचनामा केला. या पंचनाम्यामध्ये अनागोंदी कारभार असल्याचे आढळून आले. त्यावरून २७ फेब्रुवारी २0१७ रोजी वाटप करण्यात आलेले टोकन रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, शेगावच्या या केंद्रावर रात्रीच्या वेळी व्यापार्‍यांच्या मालाची आवक सुरू आहे. शिवाय त्यांच्या तुरीला लगेच टोकन दिल्या जात असून त्यांचे मोजमापही लवकर होत आहे, असा आरोप करीत मंगळवारी २0 ते २५ शेतकरी तक्रार देण्यासाठी शहर पोलीस स्टेशनला दाखल झाले होते. या बाबत शेतकर्‍यांची दखल घेत ठाणेदार यांनी शेतकर्‍यांना सोबत घेऊन नाफेडच्या केंद्रावर पोहचून चौकशी करीत संबंधितांची कानउघाडणी केली. सायंकाळपर्यंत केंद्रावर हा गोंधळ सुरूच होता.

शेगावच्या केंद्रावर शेतकर्‍यांचा माल टोकनप्रमाणे न घेता रात्रीच्या वेळेस व्यापार्‍यांचा आलेला माल मोजल्या जात आहे. या भ्रष्टाचारामध्ये बाजार समिती आणि खरेदी-विक्रीचे दोन कर्मचारी यांची मिलीभगत आहे.
- गजानन कोकाटे
तूर मालक, शेतकरी

Web Title: Nafed center chaos management

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.