मुस्लीम समाजाचा मूक मोर्चा
By Admin | Updated: December 29, 2015 01:56 IST2015-12-29T01:56:35+5:302015-12-29T01:56:35+5:30
जिल्हाधिका-यांना दिले निवेदन; हजारो मुस्लीम बांधवांचा सहभाग.

मुस्लीम समाजाचा मूक मोर्चा
बुलडाणा : शांती सद्भावनेचा संदेश देणारे महामानव प्रेषित हजरत मोहम्मद यांच्या कार्याला कलंकित करण्याचा प्रयत्न उत्तर प्रदेश येथील एका व्यक्तीकडून करण्यात आल्याचा आरोप करून त्या बेताल वक्तव्याचा निषेध करण्यासाठी सोमवारी बुलडाणा शहरात मुस्लीम बांधवांकडून मूक मोर्चा काढण्यात आला. यावेळी मुस्लीम धर्मगुरू यांच्याकडून जिल्हाधिकारी यांना एक निवेदन देण्यात आले. मौलाना गुलाम नबी, जमिअत उलमा-ए-हिंदचे जिल्हाध्यक्ष हाफिज शे. खलीलउल्लाह, मौलाना मुजाहिद, मौलाना याकुब, मौलाना तहेसिन, मौलाना फहीम, मौलाना जफर, हाफिज खालिद, मौलाना जियाउल्लाह, मौलाना मुबश्शीर रजा, मौलाना अलीम, मौलाना लुकमान यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी विजय झाडे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. निवेदनात नमूद आहे की, उत्तर प्रदेश येथील हिंदू महासभेचे पदाधिकारी कमलेश तिवारी याने प्रेषित हजरत मोहम्मद (स.) यांच्या विरोधात अपमानास्पद भाष्य करून त्यांच्या जीवनाला कलंकित करण्याचा प्रयत्न केला आहे. ही बाब अतिशय निंदनिय असून, यामुळे देशभरातील कोट्यवधी मुस्लीम बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे कमलेश तिवारीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी करण्यात आली. मुस्लीम धर्मगुरू यांच्या नेतृत्वात जिजामाता प्रेक्षागार येथून भव्य मूक मोर्चा काढण्यात आला. मोर्चा संगम चौक, जयस्तंभ चौक, एसबीआय चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मूकमोर्चात सर्व मुस्लीम संघटनेचे पदाधिकारी, राजकीय पुढारी व १0 हजाराच्यावर मुस्लीम बांधव सहभागी झाले होते.