पुतणीशी घरोबा करणार्या काकाचा सुपारी देऊन खून
By Admin | Updated: December 5, 2014 00:19 IST2014-12-05T00:19:04+5:302014-12-05T00:19:04+5:30
बरफगाव येथील खुनाचे रहस्य उलगडले : सुपारी देणारा आरोपी पुतण्या गजाआड

पुतणीशी घरोबा करणार्या काकाचा सुपारी देऊन खून
पिंपळगाव राजा (बुलडाणा): बरफगाव येथील शंकर दगडू झांबरे या इसमाचा खून हा नातेसंबंधामधील अनैतिक संबंधातून झाल्याचे समोर आले आहे. मृतक शंकर झांबरे याने नात्याने पुतणी असलेल्या मुलीसोबत प्रेमसंबंध स्थापन करून तिच्यासोबतच पती-पत्नीप्रमाणे संसार सुरू केला. या प्रकारामुळे व्यथित झालेल्या त्या पुतणीच्या भावानेच एक लाखाची सुपारी देऊन शंकर झांबरे याचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे.
बरफगाव येथील शंकर दगडू झांबरे (वय ४0) याचा २९ नोव्हेंबर रोजी खून करून त्याचे प्रेत विहिरीत टाकून दिले होते. शवविच्छेदन अहवालावरून तसेच तपासादरम्यान शंकर झांबरे याचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले होते. मृतकाच्या पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून पिंपळगावराजा येथील दस्तगीर खान व बरफगाव येथील भिका राठोड या आरोपींना अटक करून त्यांची ५ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी घेतली होती; मात्र या आरोपींनी पोलिसांसमोर आपले तोंड उघडले नाही. त्यामुळे खुनाचे कारण स्पष्ट होत नव्हते.
या गंभीर प्रकरणाच्या मुळापर्यंत जाता यावे यासाठी प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी समीर शेख व अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत सोळंके यांनी जातीने लक्ष देऊन ठाणेदार पंजाबराव वंजारी यांच्यामार्फत तपासाची चक्रे फिरविली. त्यामुळे मुख्य आरोपी अनिल नारायण झांबरे (वय ३५) याला ४ डिसेंबर रोजी अटक करण्यात यश मिळाले आणि खुनाचे धक्कादायक रहस्य समोर आले. बरफगाव येथील मृतक शंकर दगडू झांबरे याचे नात्याने पुतणी असलेल्या सध्या त्याच्या पत्नीसोबत लग्नापूर्वीच प्रेमसंबंध जुळले होते. वास्तविक त्या पुतणीचा विवाह धामणगाव गोतमारे येथे तिच्या परिवाराने करून दिला. तेथे तिला एक मुलगासुद्धा झाला; मात्र शंकर झांबरे प्रेमात आंधळा झाला होता. त्याने पुतणीचा संसार मोडून तिला बरफगाव येथे आणले व सर्व भावकीच्या समोर तिच्यासोबत गेल्या ९ वर्षांपासून राहत होता. त्याला एक मुलगीसुद्धा आहे; परंतु शंकरने नात्यासंबंधांना पायदळी घालणारे कृत्य केल्यामुळे त्याच काटा काढलाच पाहिजे असा विखारी विचार शंकरचा पुतण्या व नव्या नात्याने त्याचा साळा असलेल्या मुख्य आरोपी अनिल झांबरे याने केला. याच विचारातून मुख्य आरोपी अनिल झांबरे याने शंकर झांबरे याचा खून करण्यासाठी एक लाखाची सुपारी दिली या सुपारीतूनच शंकर झांबरे याचा २९ नोव्हेंबरला सापळा रचून खून केला आणि त्याचे प्रेत राजू परशराम झांबरे यांच्या शेतातील विहिरीत फेकून दिले. या तपासात पिं. राजा पो.स्टे. चे उन्हाळे व दोन्ही वाहनचालक चिम, अशोक देशमुख यांनी महत्त्वाची माहिती मिळवून तपास अधिकारी वंजारी यांना दिली. त्यानुसार आज ४ डिसेंबर रोजी मुख्य आरोपी अनिल झांबरे याला अटक करण्यात यश आले असून, पोलिसांसमोर मुख्य आरोपीने पोपटासारखे बोलून संपूर्ण माहिती दिली. आतापर्यंत या प्रकरणात दस्तगीर खान व भिका राठोड हे आरोपी पोलिस कोठडीत आहेत. तर मुख्य आरोपी अनिल नारायण झांबरे यालासुद्धा ६ डिसेंबरपर्यंंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या सुपारी खून प्रकरणातील चार ते पाच आरोपी मोकळे असावे, असा पोलिसांचा कयास असून, त्या दृष्टीने पोलिस तपास करीत आहेत.