पालिका कर्मचा-यांची दिवाळी आनंदात!
By Admin | Updated: October 21, 2014 00:54 IST2014-10-21T00:54:05+5:302014-10-21T00:54:05+5:30
प्रभाव 'लोकमत'चा; खामगाव पालिका कर्मचा-यांना दोन महिन्यांचे वेतन अदा.

पालिका कर्मचा-यांची दिवाळी आनंदात!
खामगाव (बुलडाणा) : महाराष्ट्र राज्य शासनाकडून खामगाव पालिकेतील कर्मचार्यांच्या वेतनासाठी सहायक अनुदान प्राप्त झाले आहे. त्यामुळे पालिका कर्मचार्यांच्या वेतनाचा मार्ग आता मोकळा झाला असून, सर्वच कर्मचार्यांना दोन महिन्यांच्या वेतनासह इतर भत्ताही दिल्या जात आहे. गेल्या तीन महिन्यांपासून पालिका कर्मचार्यांचे वेतन रखडले होते. हे येथे उल्लेखनीय!
नगरपालिकेच्या विविध विभागात काम करणार्या अधिकारी, कर्मचार्यांसह तब्बल २५८ सफाई कामगारांचे आणि शिक्षकांचे गेल्या तीन महिन्यांपासून वेतन रखडले होते. या कर्मचार्यांची दिवाळीही अंधारात जाते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती; मात्र आता शासनाकडून अनुदान मिळाल्याने कर्मचार्यांना वेतन दिल्या जात आहे. पालिका कर्मचार्यांना माहे ऑगस्ट, माहे सप्टेंबरच्या थकीत वेतनासह महागाई भत्ता, सेवानवृत्त कर्मचार्यांचे नवृत्ती वेतन, दोन महिन्यांचा थकबाकी वाहन भत्ता, गेल्या चार महिन्यांचा थकबाकी महागाई भत्ता दिल्या जात आहे. त्याचप्रमाणे ऑक्टोबर महिन्याचे वेतन अदा करण्याचाही पालिका प्रशासनाचा प्रयत्न आहे. दरम्यान, पालिकेने माहे ऑक्टोबर महिन्याचेही वेतन अदा करावे, अशी कर्मचार्यांची मागणी आहे. शासनाकडून निधी मिळाल्यानंतरही माहे ऑक्टोबर महिन्याच्या वेतनाची पालिका प्रशासनाकडून अडवणूक केल्या जात असल्याचा आरोप कर्मचारी संघटनेच्यावतीने करण्यात आला आहे.