पालिका कर्मचा-यांची दिवाळी अंधारात ?
By Admin | Updated: October 17, 2014 23:59 IST2014-10-17T23:59:42+5:302014-10-17T23:59:42+5:30
खामगाव पालिका कर्मचा-यांना तीन महिन्यांपासून वेतन नाही.

पालिका कर्मचा-यांची दिवाळी अंधारात ?
अनिल गवई /खामगाव (बुलडाणा)
खामगाव: नगर पालिकेच्या विविध विभागात काम करणार्या अधिकारी कर्मचार्यांसह तब्बल २५८ सफाई कामगारांचे वेतन रखडले आहे. त्यामुळे पालिकेतील साडेतिनशेच्यावर कर्मचार्यांची दिवाळी अंधारात जाणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
नगर पालिकेच्या आस्थापना, सामान्य प्रशासन, कर, शिक्षण, बांधकाम, आरोग्य, रेकॉर्ड, पाणी पुरवठा, नागरी सुविधा, भूमि, विद्युत, अग्निशमन, भांडार, लेखा या प्रमुख विभागासह शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी खांद्यावर असलेल्या २५८ सफाई कामगारांचे वेतन गेल्या तीन महिन्यांपासून रखडले आहे. वेतनासाठी वारंवार निवेदन वजा तक्रार देवूनही काहीच उपयोग न झाल्यामुळे पालिका कर्मचारी हतबल झाले आहेत. ऐन दिपावली सारख्या सणात पैसा हातात नसल्याने अनेक कर्मचार्यांवर कर्जबाजारी होण्याची पाळी आल्याचे चित्र आहे. दिल्यानंतअर्थातच, दिवाळी सण तोंडावर असताना पालिका कर्मचार्यांना वेतन अदा होणार नसल्याने अनेक कर्मचार्यांच्या उत्साहावर विरजण पडण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत.
ऐन दिवाळीत पालिकेतील साडेतिनशे कर्मचार्यांच्या वेतनाचा प्रश्न उपस्थित झाल्यामुळे प्रशासनही हतबल झाले आहे. शासनाने कर्मचार्यांच्या वेतनाचे अनुदान रखडून ठेवल्याने, कर्मचार्यांच्या वेतनाचा प्रश्न बिकट बनला आहे. दसरा वेतनाविना साजरा केल्यानंतर कर्मचार्यांना दिवाळीत तरी किमान वेतन होईल अशी भाबडी आशा अनेक कर्मचार्यांना आहे. अनेकांनी उसनवारी घेत, दिपावलीची खरेदी चालविली आहे. शहरातील विविध बँकांसह खासगी सावकारांकडूनही पैसे घेतले आहे. या कर्जाची परतफेड करताना नाकीनऊ येत असल्याने कर्मचार्यांना वेतनाची अपेक्षा असून दिपावली पूर्वी वेतन दिल्या जावे, यासाठी कर्मचारी संघटनेने मुख्याधिकार्यांना पत्रही सादर केले आहे.