महामार्गाच्या चौपदरीकरणात नगर पालिकेची पाईपलाईन दाबली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 14:17 IST2019-03-16T14:17:12+5:302019-03-16T14:17:31+5:30
खामगाव : पाणी पुरवठ्याची पाईपलाईन नाली खाली दाबल्याने, पालिका आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाच्या कंत्राटदारामध्ये चांगलीच जुंपली आहे.

महामार्गाच्या चौपदरीकरणात नगर पालिकेची पाईपलाईन दाबली!
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : पाणी पुरवठ्याची पाईपलाईन नाली खाली दाबल्याने, पालिका आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाच्या कंत्राटदारामध्ये चांगलीच जुंपली आहे. शुक्रवारी पालिकेच्या पथकाने शहर पोलिस स्टेशन नजीक सुरू असलेल्या कामाची पाहणी करून संबंधीत कंत्राटदाराची चांगलीच कान उघडणी केली. याप्रकारामुळे पालिका आणि ‘न्हाई’मध्ये पुन्हा एकदा खटके उडणार असल्याचे दिसून येते.
खामगाव शहरातून जाणाºया राष्टीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामास गेल्या तीन महिन्यांपासून सुरूवात करण्यात आली. सुरूवातीपासून कंत्राटदार मनमानी पध्दतीने काम करीत असल्याने, विविध शासकीय कार्यालयासोबतच सामान्य आणि व्यापारीही वेठीस धरल्या जाताहेत. दरम्यान, बस स्थानक चौक ते शहर पोलिस स्टेशनपर्यत रस्त्याच्या दुतर्फा ‘जान्दू’ कन्ट्रक्शन कंपनीकडून नालीचे खोदकाम, बांधकाम करण्यात येत आहे. यामध्ये बीएसएनएल कार्यालयासमोर आणि शहर पोलिस स्टेशनच्या बाजूला कंत्राटदाराने पाणी पुरवठ्याची पाईपलाईन नाली खाली दाबली. यामुळे शहर पोलिस स्टेशनसोबतच विविध नळ कनेक्शन प्रभावित झाल्याने, पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने शुक्रवारी खोदकाम आणि सिमेंटीकरण सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी धडक दिली. यावेळी कंत्राटदाराच्या अभियंत्यांना तात्काळ काम थांबविण्याचे निर्देश दिले. पाणी पुरवठ्याची पाईपलाईन स्थलांतरीत केल्यानंतरच नाली बांधकाम करावे, असे संबंधितांना सुचविले. दरम्यान, पालिकेच्या दबावाला न जुमानता कंत्राटदाराकडून रात्रीच्या अंधारात शुक्रवारीही काम करण्यात आले.
रस्ता विस्तारीकरणाच्या कामात पालिकेची पाईपलाईन नाली खाली दाबण्यात आली आहे. शहर पोलिस स्टेशन जवळ पाईपलाईन दाबल्या जात असल्याचे समजताच, शुक्रवारी हे काम थांबविण्यासंदर्भात संबंधितांना वरिष्ठांच्या आदेशाने सूचना देण्यात आल्या. भविष्यातील अडचणी कमी करण्यासाठी समातंर पाईप लाईन टाकल्याशिवाय कंत्राटदाराने पुढील काम करू नये, अशी अपेक्षा आहे.
- प्राजक्ता पांडे, पाणी पुरवठा अभियंता, नगर परिषद, खामगाव.