बुलडाणा जिल्ह्यातील पालिकांनी थकविले मजीप्राचे १३४ कोटी
By Admin | Updated: February 7, 2015 02:27 IST2015-02-07T02:27:30+5:302015-02-07T02:27:30+5:30
पाणीपुरवठा योजनांचा निधी थकल्याने विलंब आकारात वाढ.

बुलडाणा जिल्ह्यातील पालिकांनी थकविले मजीप्राचे १३४ कोटी
बुलडाणा : जिल्ह्यातील नगरपालिकांना पाणीपुरवठा योजना तयार करून हस्तांतरीत केल्यावर पालिकांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला एक छदामही दिलेला नाही. पाच पालिका वगळता ६ नगरपालिकांकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे तब्बल १३४ कोटी ८९ लाख ८३ हजार ६२७ रुपये थकविले असल्याचे वास्तव समोर आले आहे. यासंदर्भात आज ६ फेब्रुवारी रोजी माहिती घेतली असता थकबाकी वसुलीसाठी मजिप्रा कठोर निर्णय घेण्याच्या पवित्र्यात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने नगरपालिकांच्या विविध योजनांचा आराखडा तयार करून या योजना कार्यान्वित केल्या व पालिकांना हस्तांतरीतही केल्यात. या योजनांसाठी शासन तसेच हुडकोकडून पालिकांना देण्यात आलेले कर्ज, योजनांच्या विम्याची रक्कम, लोकवर्गणी यांची वसुली करण्याचीही जबाबदारी मजिप्राकडे देण्यात आलेली आहे. जीवन प्राधिकरण विभागाने आपली जबाबदारी पार पाडल्यावर पालिकांकडून थकबाकीची रक्कम वसुलीसाठी तगादा लावल्यावरही पालिकांनी एक छदामही मजि प्राला दिलेला नाही, त्यामुळे जवळपास पाच वर्षांपासून मोठी रक्कम थकित राहिली आहे.
या थकित रकमेचे आकडे हे कोटीच्या घरात असल्याने या रकमेचे नियोजन कसे करावे, हा प्रश्न आता पालिकांसमोर उभा राहिला आहे.
दरम्यान थकित रकमेच्या वसुलीसाठी पालिकांना प्रत्येक महिन्याला स्मरणपत्र पाठविले जाते; मात्र वसुली होत नसल्याने मूळ रकमेवरील विलंब आकार वाढला आहे. यासंदर्भात आता पालिकांची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई करण्यात यावी, अशी शिफारस मजिप्राकडून शासनाला केली जाणार असल्याचे कार्यकारी अभियंता व्ही. एम. सरकटे यांनी सांगीतले.