काँग्रेसतर्फे जिल्हाभरात आंदोलन
By Admin | Updated: March 23, 2017 02:30 IST2017-03-23T02:30:33+5:302017-03-23T02:30:33+5:30
आमदार निलंबनाचा निषेध ; धाडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन, बुलडाणा व चिखलीमध्ये आंदोलन.

काँग्रेसतर्फे जिल्हाभरात आंदोलन
चिखली (जि. बुलडाणा), दि. २२- अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकर्यांच्या कर्जमाफीसाठी आक्रमक पवित्रा घेणारे काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाच्या आमदारांनी कर्ज माफीचा उल्लेख आणि तरतूद अर्थसंकल्पात न केल्याने सभागृहाच्या दोन्ही भवनात वेलमध्ये उतरून कर्जमाफीसाठी घोषणा दिल्यानंतर काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाच्या १९ आमदारांना निलंबित केले आहे. सरकारकडून मुस्कटदाबी होत असल्याचा आरोप करीत या निलंबनाचा चिखली तालुका काँग्रेस, शहर काँग्रेस, शेतकरी संघटना व मित्र पक्षाच्यावतीने तीव्र निषेध नोंदविण्यात आला.
आमदारांच्या निलंबनाचे वृत्त कळताच व निलंबनात बुलडाण्याचे आमदार हर्षवर्धन सपकाळ यांचा समावेश असल्याचे कळल्याने कार्यकर्त्यांंमध्ये त्याचे पडसाद उमटले. कार्यकर्त्यांंनी काळे झेंडे दाखवित या घटनेचा स्थानिक जयस्तंभ चौकात निषेध केला. यावेळी तालुकाध्यक्ष विष्णू पाटील कुळसुंदर, पं.स. सभापती संगीता पांढरे, शहराध्यक्ष अतहरोद्दीन काझी, बाजार समितीचे सभापती डॉ. सत्येंद्र भुसारी, न.प. विरोधी पक्ष नेता रफिक कुरेशी, संजय पांढरे, डॉ. इसरार, नगरसेवक अ. रऊफ यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.