स्वच्छतेची चळवळ व्हावी; इव्हेन्ट नको
By Admin | Updated: November 5, 2014 23:58 IST2014-11-05T23:58:09+5:302014-11-05T23:58:09+5:30
लोकमत जागर; फोटोपुरते अभियान उद्देशहीन

स्वच्छतेची चळवळ व्हावी; इव्हेन्ट नको
बुलडाणा : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात बुलडाण्याने प्रत्येक वर्षी चमकदार कामगिरी करून राज्याचे लक्ष वेधून घेतले. गावागावांत स्वच्छतेची चळवळ उभी राहिली व आजही ही चळवळ बर्यापैकी सातत्य टिकून आहे. या पृष्ठभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेले स्वच्छ भारत अभियान हे अधिक गतिमान होण्याची गरज होती. मात्र, या अभियानाला प्रारंभापासूनच सरकारी चौकट चिटकली. केवळ फोटो काढून हे अभियान सुरू करीत असल्याचे वातावरण सर्वत्र असल्याने स्वच्छ भारत अभियान हा इव्हेंट ठरला असून, ती चळवळ होण्यासाठी मानसिकताच बदलविण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचे सुरुवात सन २000-२00१ मध्ये करण्यात आली. पहिल्याच वर्षी या अभियानात खामगाव तालुक्यातील पळशी या गावाने बाजी मारली. दुसर्या वर्षी वकाणा चमकले, पाळा, बोराळा, धोत्रा नंदई, दत्तपूर, अंत्रज, उबाळखेड, अजिसपूर, मांडवा फॉरेस्ट, राहुड, निरोड, दगडवाडी, खोर अशा अनेक गावांनी या अभियाना त सातत्य ठेवत दरवर्षी आपले नाव अमरावती विभागापर्यंत नेले. तीच शृखंला यावर्षी मडा खेड बु. या गावाने वृद्धिंगत केली आहे. गावागावांत सुरू झालेले हे स्वच्छतेचे वारे संत गाडगेबाबा व संत तुकडोजी महाराज यांच्या वैचारिक अधिष्ठानावर आधारित होते. लोकांचा सहभाग, त्याला सरकारचा हातभार असे या अभियानाचे स्वरूप असल्याने हे अभियान आजही पूर्वीच्या तीव्रतेने नसले तरी आपले अस्तित्व टिकवून आहे. त्याच धर्तीवर स्वच्छ भार त अभियान राबविण्याची गरज आहे.
स्वच्छता हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. केवळ औपचारिकता म्हणून या अभियानाकडे न पाहता सर्वांनी आपले योगदान दिले, तर आपला परिसर, गाव, शहर स्वच्छ होईल, आरोग्यदायी होईल. त्यामुळे प्रत्येकाने यामध्ये सहभाग घेणे गरजेचे असल्याचे मत आचार्य हरिभाऊ वेरूळकर यांनी व्यक्त केले तर स्वच्छ भारत अभियान हे लोकांचे आहे व लोकांच्या सहकार्याने प्रशासनाच्या सोबतीने ते राबवायचे आहे. त्यामुळे कुणीही या अभियानापासून दूर राहू नये, सर्वांनी सहभागी व्हावे, असे जिल्हाधिकारी चिंतामणी जोशी यांनी केले आहे.