'अटल भूजल' योजनेत मोताळा तालुक्याचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 16:23 IST2020-11-29T16:23:03+5:302020-11-29T16:23:14+5:30
Buldhana News मोताळा तालुक्यातील चार पानलोटक्षेत्र आणि ६८ गावांना या योजनेचा फायदा होणार आहे.

'अटल भूजल' योजनेत मोताळा तालुक्याचा समावेश
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: भूजलाच्या अनियंत्रित उपसामुळे भूजल पातळीत होत असलेली घसरण व बाधित होत असलेली गुणवत्ता थांबविण्याकरिता केंद्र शासनाच्या अटल भूजल योजनेत राज्यातील १३ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला. त्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्याचा समावेश आहे. मोताळा तालुक्यातील चार पानलोटक्षेत्र आणि ६८ गावांना या योजनेचा फायदा होणार आहे. शासनाकडून याकरीता ९० कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहे.
राज्यामध्ये भूजल उपसाचे प्रमाण अधिक आहे. भूजल उपसामध्ये फळ बागायत तसेच कृषी क्षेत्राकरीता होणारा उपसा अधिक आहे. परिणामी, या क्षेत्रातील भूजल पातळी दिवसेंदिवस खोल जात असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे या क्षेत्रातील पाणलोटक्षेत्रे अतिशोषित, शोषित, अंशतः शोषित या वर्गवारींमध्ये समाविष्ट आहेत. अशा भागातील सिंचन विहीरीची क्षमता कमी झाल्यामुळे खोल विंधन विहिरींची संख्या वाढत आहे.
याचा परिणाम भूजलाच्या उपलब्धतेवर आणि गुणवत्तेवर होत आहे. राज्यातील भूजल पुनर्भरणाची मर्यादा लक्षात घेता भूजल उपसावर मागणी आधारित व्यवस्थापनाव्दारे नियंत्रण आणणे अधिक उपयुक्त असल्याने राज्यात अटल भूजल योजनेची अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे.
राज्यातील भूजल क्षेत्रात सुधारणा करण्याच्या उद्देशाने अटल भूजल योजना १३ जिल्ह्यामधील ७३ पाणलोट क्षेत्रातील १ हजार ३३९ ग्रामपंचायतीमधील १४४३ गावांमध्ये राबविण्यात येणार आहे. यामध्ये बुलडणा जिल्ह्यातून मोताळा तालुक्यातील चार पाणलोट क्षेत्रातील ६८ ग्रामपंचायतींचा समावेश करण्यात आला आहे. याकरीता आ. संजय गायकवाड यांनी खा. प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र शासनाकडे मागणी केली होती. त्याचा पाठपुराव केल्यानंतर केंद्र शासनाच्या या योजनेत बुलडाणा जिल्ह्यातुन मोताळा तालुक्याचा समावेश करण्यात आला.