टँकरच्या शापातून आणखी ८१ गावे मुक्त होणार
By Admin | Updated: February 6, 2015 02:10 IST2015-02-06T02:10:35+5:302015-02-06T02:10:35+5:30
जलसंधारणाच्या कामांचे नियोजन; राज्य शासनाकडे २४ कोटींची मागणी.

टँकरच्या शापातून आणखी ८१ गावे मुक्त होणार
बुलडाणा : पाणीटंचाईग्रस्त अशी ओळख असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील ८१ गावात जलसंधारणाच्या योजना राबविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारकडे २४ कोटी रुपयांची मागणी केली आहे. जलसंधारण कामासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत काल ४ फेब्रुवारी रोजी मुंबई येथे बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकार्यांनी जिल्ह्यातील एकूण जलसंधारणाच्या कामासंदर्भात मुख्यमंत्र्यांसमोर सादरीकरण केले. जलसंधारणातून टँकरमुक्तीच्या या संकल्पनेची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली असून, आता लवकरच उर्वरित ८१ गावे टँकरच्या शापातून मुक्त होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात राबविलेल्या गाळ काढण्याच्या मोहिमेमुळे साठवण क्षमता वाढली. त्याचा लाभ घेण्यासाठी जलसंधारणाच्या कामांवर भर देण्यात आला. ज्या १८१ गावांना टँकरचा विळखा बसला होता त्या गावांपैकी पहिल्या टप्प्यात १२१ गावांची निवड करून गावाला पाणीपुरवठा करणार्या जलस्त्रोताजवळ सिमेंट नाला बांध, कोल्हापुरी बंधारे व गाव तलावांचे काम पुर्णत्वास नेले, त्यामुळे टँकरग्रस्त गावांची संख्या झपाट्याने घटली आहे. यासंदर्भात ४ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्यासोबत घेतलेल्या बैठकीत जिल्हाधिकारी किरण कुरूंदकर यांनी सादरीकरण केल्यावर मुख्यमंत्र्यांनी आवर्जून दखल घेतली. १८१ गावांपैकी १00 गावे टँकरमुक्त झाली असून, उरलेल्या ८१ गावांसाठी जलयुक्त शिवार योजनेसोबतच जलसंधारणाच्याही कामाचे नियोजन केले असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितल्यावर उरलेल्या ८0 गावांसाठीही निधी विविध योजनेतून निधी दिला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने तत्काळ ८१ गावांसाठी विविध कामांचा प्रस्ताव तयार केला असून, त्यासाठी २४ कोटीचा खर्च अपेक्षित आहेत. या बैठकीला जिल्हाधिकारी किरण कुरूंदकर, वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ.प्रवीण कथने आदी उपस्थित होते.