मोर्चा, निदर्शने, संप, आंदोलनाचा दिवस
By Admin | Updated: September 2, 2015 23:59 IST2015-09-02T23:59:59+5:302015-09-02T23:59:59+5:30
कामगार कायद्यातील बदलांविरुद्ध देशव्यापी संपाचा बुलडाणा जिल्ह्यात व्यापक प्रभाव.

मोर्चा, निदर्शने, संप, आंदोलनाचा दिवस
बुलडाणा : कामगार कायद्यातील बदलांविरुद्ध दहा केंद्रीय कामगार संघटनांनी २ सप्टेंबर रोजी एक दिवसाचा देशव्यापी संप पुकारला होता. याचा प्रभाव बुलडाणा जिल्ह्यातही पाहायला मिळाला. या संपात विविध कर्मचारी संघटना सहभागी झाल्या. यामुळे शहरातील विविध शासकीय कार्यालये, बँकांमध्ये कामकाज प्रभावित झाल्यामुळे जनसामान्यांना त्याचा फटका बसला. संपात सहभागी विविध संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे निषेध व्यक्त करीत आपल्या मागण्यासंदर्भात जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले.
आयटक-सिटूचा मोर्चा
आयटकप्रणीत महाराष्ट्र राज्य आंगणवाडी-बालवाडी कर्मचारी युनियन तसेच सीटूने बुलडाणा शहरातून मोर्चा काढला. स्थानिक जयस्तंभ चौकातून निघालेला हा मोर्चा बाजार लाइन, कारंजा चौक, स्टेट बँक चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. राज्य सरकारी कर्मचार्यांची निदर्शने कामगार संघटनांनी पुकारलेल्या संपात सहभागी महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयापुढे निर्दशने करण्यात आली. यावेळी शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले.
*घरकुलासाठी नागरिकांचे उपोषण
बुलडाणा शहरातील जुना गाव परिसरातील नगरपरिषदेच्या खुल्या भूखंडावर घरकुल योजनेतून तत्काळ घरकुलाचे बांधकाम सुरू करण्यात यावे, या मागणीसाठी जुना गाव परिसरातील नागरिकांनी २ सप्टेंबरपासून उपोषण सुरू केले.
*पुतळे बसविण्यासाठी आंदोलन
बुलडाणा शहरातील मुख्य जयस्तंभ चौकात छत्रपती शिवाजी महाराज आिण डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांचे पुतळे बसविण्यात यावे, या मागणीसाठी २ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे नागरिकांनी पाण्यात बसून अभिनव आंदोलन केले. बुलडाणा शहरातील जयस्तंभ चौकात जिल्हा परिषदेच्या मालकीचा खुला भूखंड महामानवांचे पुतळे बसविण्यासाठी नगरपरिषदेला देण्यात आला. तरीही पुतळे बसविण्याच्या कामात उशीर होत आहे. याबाबत कित्येक वेळा प्रशासनाकडे लेखी निवेदन देण्यात आले; मात्र त्यांकडे दुर्लक्ष झाले.
*नर्सेस फेडरेशनच्यावतीने काम बंद आंदोलन
विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्यावतीने काम बंद करुन संप पुकारण्यात आला. विविध शासकीय रुग्णालयांतील पदभरती, कंत्राटी व अस्थायी अधिपरिचारिकांना शासनसेवेत कायम करणे, बंधपत्रित अधिपरिचारिकांना सेवेत कायम करणे तसेच त्यांची आर्थिक व शारीरिक पिळवणूक थांबवणे, अधिपरिचारिकांच्या अकारण प्रशासकीय बदल्या रद्द करणे, केंद्राप्रमाणे पे-बँड व भत्ते यांसह कर्तव्यावर असताना प्रशासनाकडून संरक्षणाची हमी आदी अनेक मागण्यांसाठी हा बंद पुकारण्यात आला होता. सदर संपामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय, क्षय आरोग्यधाम यांसह जिल्ह्यातील सर्व अधिपरिचारिकांनी नर्सेस फेडरेशनच्या या संपामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.