मोताळ्यातील आंगणवाडी सेविकांनी केले मोबाइल परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:36 IST2021-08-26T04:36:38+5:302021-08-26T04:36:38+5:30
गेल्या तीन वर्षांपूर्वी आंगणवाडी केंद्र डिजिटल आणि ऑनलाइन कामकाज करण्यासाठी तत्कालीन युती शासनाने आंगणवाडी सेविकांना मोबाइल दिले. आता या ...

मोताळ्यातील आंगणवाडी सेविकांनी केले मोबाइल परत
गेल्या तीन वर्षांपूर्वी आंगणवाडी केंद्र डिजिटल आणि ऑनलाइन कामकाज करण्यासाठी तत्कालीन युती शासनाने आंगणवाडी सेविकांना मोबाइल दिले. आता या मोबाइलचा गॅरंटी कार्यकाळ संपलेला आहे. मोठ्या प्रमाणात हे मोबाइल नादुरुस्त होत आहेत. त्यांचा दुरुस्ती खर्च किमान ३ ते ४ हजार रुपये येतो. मुळातच अल्प मानधनावर काम करीत असलेल्या अंगणवाडी सेविकांना स्वतः एवढा खर्च करणे परवडत नाही. शिवाय या मोबाइलची कार्यक्षमता कमी असल्यामुळे वेळोवेळी शासनस्तरावर नवनवीन ॲप डाऊनलोड करण्यास सांगण्यात येते. पूर्वीचे कॉमन ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर बदलून त्याऐवजी पोषण ट्रँकर ॲप्लिकेशनमध्ये कामकाज करण्यास सांगितले जात आहे. हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यास बऱ्याच अडचणी येत आहेत, तसेच हे ॲप्लिकेशन इंग्रजीमध्ये असल्याने जुन्या व अल्प शिक्षित सेविकांना त्याची भाषा कळत नाही. त्याऐवजी शासनाने त्यामध्ये बदल करून मराठी भाषेत हे ॲप्लिकेशन उपलब्ध करून द्यावे. एवढ्या अडचणी असूनही शासनाने हे सॉफ्टवेअरचे दैनंदिन कामकाज त्यांच्या मासिक मानधनाला जोडलेले आहे. जर एखाद्या दिवशी तांत्रिक कारणामुळे यात माहिती भरली गेली नाही, तर त्या दिवशीचे मानधन त्यांच्या पगारातून कपात केले जाते. हा त्यांच्यावर खूप मोठा अन्याय आहे. मुळातच त्यांना मिळणारे अत्यल्प मानधन आणि वाढलेली प्रचंड महागाई याचा मेळ कौटुंबिक जबाबदारी पार पाडताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या अन्यायाच्या विरोधात हे आंदोलन आम्हाला करावे लागत आहे. दोषमुक्त, कार्यक्षम आणि अत्याधुनिक मोबाइल शासनाने उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी सिटूच्या वतीने पंजाबराव गायकवाड यांनी शासनाकडे यावेळी केली. या आंदोलनाचे नेतृत्व तालुकाध्यक्ष प्रतिभा वक्टे, मायाताई वाघ, वैशाली चाहकर, सुवर्णा लाटे, माया लाटे, अर्चना सोळंके, आशा एंडोले, अश्विनी पाखरे, कमल लोखंडे, राजश्री महाराज, पंचफुला बढे इत्यादींनी केले.