गौण खनिजमाफियांचे धाबे दणाणले
By Admin | Updated: June 28, 2014 01:43 IST2014-06-28T01:30:38+5:302014-06-28T01:43:10+5:30
मेहकर व सिंदखेड राजा तालुक्यात महसुल विभागाची कारवाई.

गौण खनिजमाफियांचे धाबे दणाणले
मेहकर : महसूल विभागाच्यावतीने गौण खनिज तस्करांवर गत दोन महिन्यामध्ये ३६ वाहनधारकांवर कारवाई करुन २ लाख १ हजार ६00 रुपये वसूल करण्यात आले आहेत. महसूल विभागाने गौण खनिज तस्करांविरुद्ध कारवाईचा सपाटासुरू केल्याने अवैध गौण खनिज वाहतुकदारांचे धाबे दणाणले आहेत.
मेहकर व सिंदखेडराजा तालुक्यातून एकमेव पैनगंगा आणि खडकपुर्णा नदी वाहते. या नदीमध्ये पाच ते २५ फुट खोल रेतीसाठा आहे. परंतू, महसुल खात्याच्या काही अधिकार्यांच्या दुर्लक्षामुळे अवैध गौण खनिज उत्खननाला तालुक्यात पेव फुटले आहे. महसूल विभाग गौण खनिज तस्करांवर आळा घालण्यासाठी उपविभागीय अधिकारी प्रभाकर बेंडे, तहसीलदार निर्भय जैन यांच्यासह सहकार्यांनी गौण खनिज माफीयांवर पाळत ठेऊन गत दोन महिन्यात ३६ वाहन धारकावर कारवाई केली आहे. महसुल विभागाच्यावतीने ९ मे ते २५ जून दरम्यान अवैध रेती वाहतूक करणार्या १७ वाहनांवर कारवाई करुन १ लाख १0 हजार ४00 रुपये दंड वसुल केला आहे.
तसेच अवैध माती वाहतूक करणार्यांकडून २७ हजार ५00, अवैध मुरुम वाहतूक करणार्यांकडून ५७ हजार ३00, अवैध गिट्टी वाहतूक करणार्यांकडून ३ हजार २00 व डब्बर वाहतूक करणार्यांकडून ३ हजार २00 रुपये दंड वसुल केला आहे. अशाप्रकारे दोन महिन्यात अवैध गौण खनिज माफीयांकडून २ लाख १ हजार ६00 रुपये गोळा करण्यात आले आहेत. ९ मे ते २५ जून दरम्यान मेहकर, फैजलापूर, हिवराआश्रम, जानेफळ, पांगरखेड, अंजनी बु., उकळी, सोनाटी या परिसरात मोठय़ा प्रमाणात गौण खनिज माफीयांवर कारवाई करण्यात आली.
*नियमाला मूठमाती
दिवसाच्या सकाळी ६ ते सायंकाळी ६ या वेळेव्यतिरीक्त नदीपात्रात दोन मिटर पेक्षा जास्त वाळू उपसा करण्यास मनाई असतांनाही, तसे न होता येथे सर्रास नियमाला मुठमाती दिल्या जात आहे. रेतीची वाहतूक करतांना वाळू झाकून नेणे बंधनकारक असतांना कोणीही हे नियम पाळत नाहीत. तसेच नियमबाह्य अधिक प्रमाणात रात्रीच्या वेळीच रेतीची वाहतूक मोठय़ा प्रमाणात होत आहे.