निवडणुकीतून लालपरीला लाखाेंचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:29 IST2021-01-15T04:29:14+5:302021-01-15T04:29:14+5:30
बुलडाणा : कोरोनामुळे अर्थचक्र बिघडलेल्या एसटी महामंडळाला ग्रामपंचायत निवडणुकीतून लाखाेंचा आधार मिळाला. जिल्ह्यातील ४९८ ग्रामपंचायत निवडणूक मतदानासाठी मतदान ...

निवडणुकीतून लालपरीला लाखाेंचा आधार
बुलडाणा : कोरोनामुळे अर्थचक्र बिघडलेल्या एसटी महामंडळाला ग्रामपंचायत निवडणुकीतून लाखाेंचा आधार मिळाला. जिल्ह्यातील ४९८ ग्रामपंचायत निवडणूक मतदानासाठी मतदान केंद्रावरील कर्मचारी व ईव्हीएम घेऊन २०२ बसेस १४ जानेवारी रोजी धावल्या. मतदान साहित्य व कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी एसटी महामंडळ बुलडाणा विभाग व निवडणूक विभागामध्ये ५१ लाखांचा करार झाला असून, २५ लाख महामंडळाकडे जमा झाले आहेत. कोरोनामुळे एसटी महामंडळ आर्थिक अडचणीत सापडले आहे. लॉकडाऊन काळात बसेस बंद होत्या, त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या बुलडाणा विभागाला कोट्यवधींचा तोटा सहन करावा लागला. एसटीची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मध्यंतरी मालवाहतुकीचा पर्याय एसटीने निवडला. दरम्यान, एसटी बसेसमधून प्रवाशांची वाहतूक सुरू झाल्यानंतरही प्रवाशांचा प्रतिसाद कमीच राहिला. त्यामुळे काही भागात एसटीला लागणारा इंधन खर्चही वसूल करणे अवघड झाले होते. दिवाळी हंगाम तेवढा एसटीसाठी लाभदायक राहिला आहे. अर्थिक अडचणीत असलेल्या एसटीला आता ग्रामपंचायत निवडणुकीमुळे चांगला अर्थलाभ झाला आहे. १५ जानेवारी रोजी ग्रामपंचायतीसाठी मतदान होत आहे. या मतदानप्रक्रियेमध्ये ईव्हीएमला सुरक्षितरीत्या केंद्रावर पोहोचविणे व मतदान झाल्यानंतर ते तहसील कार्यालय किंवा मतमोजणीच्या ठिकाणी आणणे महत्त्वाचे असते. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी एसटीच्या महामंडळाच्या २०२ बसेस देण्यात आल्या आहेत. यासाठी ५१ लाखांमध्ये करार झालेला असून, अडचणीच्या काळात एसटी महामंडळासाठी ही निवडणूक लाभदायी ठरली आहे.
२०० शेड्यूल रद्द
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान केंद्रावर मतदान यंत्र व कर्मचाऱ्यांना पोहचविणे आणि परत आणण्यासाठी एसटी महामंडळाला २०० शेड्यूल रद्द करावे लागले. १४ व १५ जानेवारी रोजी २०२ एसटी बसेस निवडणुकीसाठी दिलेल्या आहेत. प्रत्येक बसेसवर एक चालक या प्रमाणे २०० चालकांच्या ड्यूट्या लावण्यात आल्या आहेत.
मतदानासाठी गावी आलेल्यांची अडचण
१४ जानेवारी रोजी ग्रामीण भागातील बऱ्याच बसेस धावू शकल्या नाहीत. त्यामुळे मतदानासाठी बाहेरगावावरून घरी येणाऱ्यांची मोठी अडचण निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले. बसस्थानकावर आल्यानंतर गावात जाण्यासाठी बसच नसल्याने अनेकांना उमेदवारांना या मतदानांसाठी वाहनाची व्यवस्था करावी लागली.
मतदान यंत्र व कर्मचाऱ्यांसाठी २०२ बसेस देण्यात आल्या आहेत. त्यासाठी ५१ लाखांचा करार झालेला आहे.
ए.यू. कच्छवे, वाहतूक नियंत्रक, बुलडाणा
आगारनिहाय बसेस
बुलडाणा २४
चिखली ३३
खामगाव २८
मेहकर ४०
जळगाव जामोद ३६
मलकापूर २८
शेगाव १३