एमआयडीसीतील भूखंडांचे दर वाढले!

By Admin | Updated: February 19, 2016 01:43 IST2016-02-19T01:43:12+5:302016-02-19T01:43:12+5:30

पाच तालुक्यांत क्षेत्र नाही; बुलडाणा व संग्रामपुरात नाममात्र वाढ, सहा तालुक्यांमध्ये दुप्पट दर.

MIDC land rates increased! | एमआयडीसीतील भूखंडांचे दर वाढले!

एमआयडीसीतील भूखंडांचे दर वाढले!

नीलेश शहाकार/बुलडाणा
जिल्ह्यातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या भूखंडांचे दर वाढविण्यात आले आहेत. चार वर्षानंतर ही दरवाढ करण्यात आली आहे. औद्योगिक व वाणिज्यीक भूखंडांचे बहुतांश दर हे दुप्पट करण्यात आले आहेत. बुलडाणा व संग्रामपूर येथील औद्योगिक क्षेत्र भूखंडात नाममात्र वाढ असून, इतर तालुक्यांमध्ये दर दुपटीने वाढविण्यात आले आहेत.
जिल्ह्यात बुलडाणा, मलकापूर, मेहकर, संग्रामपूर, लोणार, देऊळगावराजा, खामगाव आणि चिखली येथे एमआयडीसी आहे. या आठ औद्योगिक क्षेत्रांमध्ये एकूण ६६५.७८ हेक्टर जागा उद्योगांसाठी प्रस्तावित करण्यात आली आहे. उद्योगांसाठी ही जमीन महामंडळाच्या ताब्यात असली तरी या क्षेत्रात एकूण ९९३ विकसित भूखंडांपैकी ७५३ भूखंडांचे वाटप विविध उद्योगघटकांना करण्यात आले. या वाटप केलेल्या भूखंडांपैकी २८७ भूखंडांवर उत्पादन प्रक्रिया सुरू आहे; मात्र आजही ३६६ भूखंडांवर कोणताही उद्योग, व्यवसाय संबंधित मालकाने उभारला नाही. उद्योजकांनी बरेच वर्षाआधी अवघ्या चार ते पाच रुपये प्रति चौरस फूट दराने उद्योगाच्या नावाखाली भूखंड घेतले; परंतु गेल्या कित्येक वर्षांंपासून हे भूखंड पडून असून, प्रत्यक्षात उद्योग सुरू केलेला नाही. त्यानंतरही एमआयडीसीने हे भूखंड परत घेण्याची तसदी घेतली नाही, हे विशेष.
एमआयडीसीने सन २0१२ मध्ये भूखंडांची दरवाढ केली होती. त्या चार वर्षांंनंतर आता ही दरवाढ केली गेली आहे. बुलडाणा औद्योगिक भूखंड ४0 रुपये चौरस मीटर दराने दिले गेले होते. त्याचे दर आता ६५ रुपये प्रति चौरस मीटर करण्यात आले आहे. वाणिज्यिक भूखंडाचे दर ८0 रुपयांवरून १३0 रुपये करण्यात आले आहेत. अन्य एमआयडीसीतील औद्योगिक व वाणिज्यिक भूखंडाचे दर दुपटीने वाढविले गेले, तर यवतमाळ एमआयडीसीत नाममात्र २५ ते ५0 रुपयांची दरवाढ केली गेल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

Web Title: MIDC land rates increased!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.