Buldhana: मेहकरला बनला रात्रंदिवस पाठाचा आध्यात्मिक विक्रम, नृसिंह मंदिरात झाले विष्णु सहस्त्रनामाचे अखंड पाठ
By ब्रह्मानंद जाधव | Updated: August 19, 2023 18:56 IST2023-08-19T18:55:27+5:302023-08-19T18:56:07+5:30
Buldhana: मेहकर येथील नृसिंह मंदिरात अधिकमास व श्रावणमासाच्या पर्वावर १२ ऑगस्ट ते १९ ऑगस्ट या काळात विष्णुसहस्त्रनाम या स्तोत्राचे रात्रंदिवस अखंडपणे हजारो पाठ करण्यात आले.

Buldhana: मेहकरला बनला रात्रंदिवस पाठाचा आध्यात्मिक विक्रम, नृसिंह मंदिरात झाले विष्णु सहस्त्रनामाचे अखंड पाठ
- ब्रह्मानंद जाधव
मेहकर - येथील नृसिंह मंदिरात अधिकमास व श्रावणमासाच्या पर्वावर १२ ऑगस्ट ते १९ ऑगस्ट या काळात विष्णुसहस्त्रनाम या स्तोत्राचे रात्रंदिवस अखंडपणे हजारो पाठ करण्यात आले. यामध्ये शहरातील २०५ भाविकांनी सहभाग घेतला. श्री नरसिंह संस्थानच्या वतीने झालेला हा उपक्रम आध्यात्मिक क्षेत्रातला एक विक्रम आहे.
जगातील अकरापैकी सहावे अशी ख्याती असलेल्या मेहकरच्या प्राचीन नरसिंह मंदिरात विष्णुसहस्त्रनाम या स्तोत्राच्या पठणाचे विशेष महत्त्व आहे. अधिकमास आणि श्रावणमास यांच्या जोडावर म्हणजे अधिकातील शेवटच्या शनिवारपासून ते श्रावणातील पहिल्या शनिवारपर्यंत हे पाठ करण्यात आले. दिवसभर महिला आणि रात्रभर पुरुष भाविकांनी या स्तोत्राचे सलग पाठ केले. एक आठवडाभर रात्रंदिवस सलगपणे या स्तोत्राचे पाठ करणे हा आध्यात्मिक क्षेत्रातला एक विक्रम असून हा इतरत्र कुठेही होताना दिसत नाही. नरसिंह संस्थानचे अध्यक्ष सद्गुरु ॲड.रंगनाथ महाराज पितळे यांच्या प्रेरणेने दरवर्षी हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडत आहे.
महाप्रसादाचे वितरणाने उत्सवाची सांगता
१९ ऑगस्ट रोजी संत बाळाभाऊ महाराजांच्या पादुकांचे पूजन, सामूहिक पाठ, सद्गुरु ॲड.पितळे महाराज यांचे आशीर्वचन व महाआरती होऊन या उपक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी संस्थानच्या वतीने विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. शेवटी भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.