दारुड्या पतीने केला पत्नीचा खून
By Admin | Updated: December 5, 2014 00:17 IST2014-12-05T00:17:35+5:302014-12-05T00:17:35+5:30
खामगाव तालुक्यातील आठ दिवसात खुनाची तिसरी घटना.

दारुड्या पतीने केला पत्नीचा खून
खामगाव (बुलडाणा): दारुसाठी पैसे दिले नाही म्हणून पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना काल ३ डिसेंबर रोजी येथील सिव्हिल लाईन भागात घडली. याप्रकरणी शहर पोलिसांनी आज मृतकच्या नातेवाइकांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
स्थानिक सिव्हिल लाईन भागातील गोडे भवनमध्ये राहणार्या विशाखा मधुसूदन गोडे (वय २९) यांना काल दुपारी सामान्य रुग्णालयात आणण्यात आले होते. यावेळी डॉक्टरांनी तपासणी केली असता विशाखा गोडे या मृतावस्थेत आढळून आल्या होत्या. याबाबत काल शहर पोलिसांनी मृतकचा पती मधुसूदन श्रीकृष्ण गोडे याने दिलेल्या फिर्यादीवरुन कलम १७४ जाफौनुसार आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. दरम्यान, आज मृतक विशाखा गोडे हिचे नातेवाईक शिवाजी ज्ञानदेव ढोले रा.खैरा ता.नांदुरा यांनी शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली.
या फिर्यादीत म्हटले आहे की, मधुसूदन श्रीकृष्ण गोडे (वय ३४) याने काल ३ डिसेंबर रोजी पत्नी विशाखा हिला दारु पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र दारुसाठी विशाखा हिने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे पती मधुसूदन गोडे याने पत्नी विशाखा हिचा साडीने गळा आवळून खून केला. या आशयाच्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी आज ४ डिसेंबर रोजी मधुसूदन गोडे याच्याविरुद्ध कलम ३0२ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिलीप पाटील करीत आहेत.