बाजार समित्या बरखास्त
By Admin | Updated: November 12, 2014 00:26 IST2014-11-12T00:22:27+5:302014-11-12T00:26:37+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील बाजार समित्यांवर प्रशासक नियुक्त करण्याचे आदेश प्राप्त.

बाजार समित्या बरखास्त
बळीराम वानखडे / खामगाव (बुलडाणा)
जिल्हय़ातील सात कृषी उत्पन्न बाजार समित्या बरखास्त करण्यात आल्या असून, त्या बाजार समितीवर शासनाचा प्रतिनिधी प्रशासक म्हणून नियुक्त करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक बुलडाणा यांना प्राप्त झाले आहेत. बुलडाणा जिल्हय़ातील एकूण ९ पैकी ७ कृषी उत्पन्न बाजार समितीवरील अशासकीय संचालक मंडळ कार्यरत आहेत. यांचा कार्यकाळ संपल्यामुळे या बाजार समितीवर शासनातर्फे नियुक्त करण्यात आलेले प्रशासक उद्या १२ नोव्हेंबरपासून पदभार घेणार आहेत. यामध्ये बुलडाणा, जळगाव जा., संग्रामपूर, खामगाव, चिखली, मेहकर व दे. राजा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचा समावेश होता. जिल्ह्यातील मलकापूर व नांदुरा अशा दोन कृषी उत्पन्न बाजार समित्यासुद्धा बरखास्त करण्यात येणार आहेत; मात्र या दोन्ही बाजार समित्यांचे मंडळ बरखास्त करण्याच्या आदेशाला शासनानेच स्थगिती दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे उद्या १२ नोव्हेंबर रोजी नांदुरा व मलकापूर वगळता सात बाजार समित्यांवर शासकीय सदस्य प्रशासक म्हणून पदभार घेतील. *खामगाव बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू जिल्हय़ातील सर्वात श्रीमंत असलेल्या खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून, सचिव व गटविकास अधिकार्यांकडून मतदार याद्या मागविण्यात आल्या आहेत. खामगाव बाजार समितीचे वार्षिक उत्पन्न हे ७ कोटी ७0 लाख २६ हजार ३३0 रुपये आहे. या बाजार समितीमध्ये एकूण १८ संचालक निवडून द्यायचे असतात. या सर्व संचालक निवडीची प्रक्रिया ३0 ऑक्टोबर १४ पत्र क्र. १२९३६ अन्वये सुरू झाली आहे.