पाण्यासाठी मनसेचे अनोखे आंदोलन
By Admin | Updated: October 14, 2015 00:33 IST2015-10-14T00:33:02+5:302015-10-14T00:33:02+5:30
पाण्याचे टॅँकर बंद केल्याच्या पृष्ठभूमीवर मलकापूर येथे आंदोलन; आझाद हिंद संघटनेचाही सहभाग.

पाण्यासाठी मनसेचे अनोखे आंदोलन
मलकापूर (जि. बुलडाणा): : पाणीप्रश्नी महाराष्ट्र नव निर्माण सेना आणि आझाद हिंद संघटनेच्यावतीने तहसिलचे श्राद्ध आंदोलन १२ ऑक्टोबर रोजी करण्यात आले. वाकोडी व मलकापूर ग्रामीण ग्रामपंचायताचे पाण्याचे टॅँकर बंद केल्याच्या पृष्ठभूमीवर हे आंदोलन करण्यात आले. सात ऑक्टोबरला या गावांना टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. येथील पाणी पुरवठा योजना अंतिम टप्प्यात असून ती कार्यान्वीत होण्यास दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे ३१ डिसेंबरपर्यंत टँकरचे प्रस्ताव वाढवून द्यावेत, ही आंदोलनकर्त्यांची मागणी होती. टँकर बंद झाल्याने पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी तथा घटस्थापनेच्या दिवशी येथे पाण्याची उपलब्धता होत नसल्याने मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष तथा वाकोडी ग्रामपंचायत सदस्य गजानन ठोसर, आझाद हिंद संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजय टप यांच्या नेतृत्त्वात हे प्रशासनाचे श्राद्ध आंदोलन तहसिलच्या आवारात करण्यात आले. या आंदोलनात विश्वनाथ पुरकर, मंगेश सातव, किशोर राऊत, राहूल गोसावी, शालीकराम पाटील, राहूल तायडे, यांच्यासह अन्य सहभागी झाले होते.