मलकापुरात मुख्याध्यापकावर गोळ्या झाडल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2017 19:32 IST2017-06-29T19:32:04+5:302017-06-29T19:32:04+5:30
दुचाकीवर आलेले अज्ञात दोघे पसार

मलकापुरात मुख्याध्यापकावर गोळ्या झाडल्या
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : येथील घिर्णी रोडवरील महाराणा प्रताप नगरातील रहिवाशी मुख्याध्यापकावर मोटारसायकलने आलेल्या दोघांनी गोळ्या झाडल्या. ही घटना बुधवारी रात्री १०.४० वाजताच्या सुमारास घडली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या मुख्याध्यापकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मोताळा तालुक्यातील निपाणा येथील भिकमसिंह पाटील विद्यालयात मुख्याध्यापक म्हणून कार्यरत स्थानिक महाराणा प्रताप नगरातील रहिवाशी रवीसिंह राजपूत वय ४६ हे बुधवारी रात्री १०.४० वाजताच्या सुमारास घरासमोर उभे राहून मोबाईलवर कोणाशी तरी बोलत होते. त्यावेळी मोटारसायकलवर दोन जण तेथे आले. यामधील एकाने पाठीमागून राजपूत यांच्यावर गोळ्या झाडल्या. यात राजपूत हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी त्यांच्यावर अडीच तास शस्त्रक्रिया करुन दोन गोळ्या काढण्यात आल्या. त्यांच्यावर आयसीयुत उपचार सुरु असून अद्याप ते शुध्दीवर आलेले नाहीत. दरम्यान याप्रकरणी मुख्याध्यापक पाटील यांची पत्नी सौ.सपना राजपूत यांनी दिलेल्या तक्रारीवरुन मलकापूर पोलिसांनी अपराध क्रमांक ३०६/२०१७ कलम ३०७, ३४ भादंविनुुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार ठाकरे करित आहेत.