भूसंपादन वेगाने करा!
By Admin | Updated: December 23, 2015 02:23 IST2015-12-23T02:23:50+5:302015-12-23T02:23:50+5:30
खडकपूर्णा प्रकल्पाची उंची वाढविण्याबाबत अहवाल तपासण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश.

भूसंपादन वेगाने करा!
बुलडाणा : महत्त्वाकांक्षी जिगाव प्रकल्पाच्या पहिल्या व दुसर्या टप्प्यातील भूसंपादन, पुनर्वसनाचे काम त्वरित पूर्ण करावे, त्यासाठी भूसंपादन उपजिल्हाधिकारी यांची रिक्त पदे त्वरित भरण्यात येतील. कनिष्ठ अभियंत्यांच्या रिक्त जागांवर परीक्षा न घेता गुणांच्या आधारे नियुक्त्या देण्यात याव्यात. ज्यामुळे रिक्त पदे त्वरित भरण्यात येवून प्रकल्प पुर्णत्वास न्यावेत, तसेच खडकपूर्णा प्रकल्पाची उंची वाढविण्यासंदर्भात मागील दहा वर्षाचे पाणीसाठ्याचे रेकॉर्ड तपासावे, तसेच पाणीसाठा वाढल्यामुळे होणार्या परिणामांचा अभ्यास करावा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. विधानभवनच्या बैठक सभागृहात बुलडाणा जिल्हा आढावा बैठक मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी आढावा घेताना मुख्यमंत्री बोलत होते. बैठकीला पालकमंत्री एकनाथराव खडसे, सहकार व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार सर्वश्री पांडुरंग फुंडकर, हर्षवर्धन सपकाळ, आकाश फुंडकर, राहुल बोंद्रे, डॉ. संजय कुटे, संजय रायमुलकर, शशीकांत खेडेकर, मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय, अपर मुख्य सचिव आनंद कुळकर्णी, पुरवठा विभागाचे सचिव दीपक कपूर, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव जैन, वन विभागाचे सचिव विकास खारगे, जलसंपदा विभागाचे सचिव सतीश गवई, जलसंधारण विभागाचे सचिव प्रभाकर देशमुख, पाणीपुरवठा विभागाचे सचिव राजेश कुमार, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती दीपा मुधोळ आदी उपस्थित होते. जिगाव प्रकल्पाचा आढावा घेताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, की जिल्ह्यातील सिंचनाच्या प्रमाणात वाढ होण्यासाठी अपूर्णावस्थेत व निर्माणाधीन सिंचन प्रकल्पांमध्ये भूसंपादनाची कामे वेगाने पूर्ण करावी, असे निर्देश दिले.