बुलढाणा : आपण प्रथम जबाबदार शिवसैनिक, नंतर आमदार किंवा मंत्री. शिवसैनिक म्हणजे शिस्त आणि आदर्श. आपल्या वर्तनामुळे पोलिस दलाची प्रतिमा मलीन होऊ नये, वर्दीचा सन्मान राखला गेला पाहिजे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार संजय गायकवाड यांना समज दिली. पोलिस दलाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने त्यांनी गायकवाड यांच्यावर नाराजी व्यक्त केली. जिजामाता प्रेक्षागृहात रविवारी आभार सभेत बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, प्रत्येक क्षेत्रात बोटावर मोजण्याएवढी अपवादात्मक चुकीची माणसं असतात. म्हणून संपूर्ण क्षेत्राला दोषी धरता येत नाही. एखाद्या पोलिसाच्या बाबतीत तक्रार असेल, तर थेट माझ्याकडे किंवा मुख्यमंत्र्यांकडे मांडावी, असा सल्लाही त्यांनी दिला.
आमदार गायकवाड यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत, पोलिस दल अकार्यक्षम असल्याची टीका केली होती. त्यावर उपमुख्यमंत्र्यांनी सभेत गायकवाड यांना समज दिली. मात्र, गायकवाड यांनी खुलासा करत, माझे वक्तव्य संपूर्ण पोलिस दलावर नव्हते, असे स्पष्ट करून माफीही मागितली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वक्तव्याची दखल घेतल्याने गायकवाड यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
कारवाईचा इशारा
मुख्यमंत्री आणि गृहमंत्री फडणवीस यांनी आमदार गायकवाड यांच्या वक्तव्याची दखल घेत उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याशी बोलून गायकवाड यांना कडक समज देण्यास सांगणार आहे. वारंवार असे चालणार नाही. ते बोलतच असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला होता.
आमदारांविरोधात गुन्हा
पोलिस दलावर टीका केल्याप्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्याविरुद्ध बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत पोलिस दलाला ‘अकार्यक्षम’ आणि ‘हप्तेखोर’ म्हणत तीव्र शब्दांत टीका केली होती.