लोणार तालुक्यात महावितरणचा भोंगळ कारभार
By Admin | Updated: July 27, 2016 00:02 IST2016-07-27T00:02:12+5:302016-07-27T00:02:12+5:30
वीज ग्राहक त्रस्त; अनेक दिवसांपासून शहरातील लाइन गुल.

लोणार तालुक्यात महावितरणचा भोंगळ कारभार
मयूर गोलेच्छा / लोणार (जि. बुलडाणा)
सध्या पावसाळ्याचे दिवस असून शहरात वारंवार विद्युत पुरवठा खंडीत होत असल्याने नागरिकांनी रात्र जागून काढावी लागत आहे. बहुतांशी कामे विजेअभावी खोळंबल्याने नागरिक त्रस्त झाले असून, महावितरणमध्ये असलेल्या प्रभाराच्या वादाने कळस गाठला आहे.
महावितरणचा लोणार भाग - १ चा पदभार कनिष्ठ अभियंता खाडे यांचेकडे असून ते प्रशिक्षणासाठी गेले आहे. जाण्यापूर्वी त्यांनी आपला पदभार कनिष्ठ अभियंता खमके यांचेकडे द्यावा, असे सुचविले होते. खमके यांनी लोणार - १ चा पदभार स्विकारला नाही. तर पावसाळ्याच्या दिवसात कर्मचार्यांना सुटीवर न जाण्याचे वरिष्ठाचे निर्देश असतांना लोणार येथील सहाय्यक अभियंता मुचलवार हे गेल्या आठ दिवसापासून सुटीचा अर्ज न देता निघून गेले आहे. यामुळे लोणार येथील विद्युत कार्यालयास कोणीही वाली न राहिल्याचे सध्या चित्र आहे. सध्या लोणार व ग्रामीणचा भार कनिष्ठ अभियंता खोडके यांचेकडे असून, इतर कनिष्ठ अभियंत्याच्या अनुपस्थितीत खोडके यांचेवर कार्यालयीन कामचा बोझा वाढला आहे. २४ जुलैला झालेल्या दमदार पावसाने जागोजागी विद्युत खांब कोसळल्याने काही ठिकाणी विद्युत वाहिनीला क्षती पोहचली आहे. यामुळे रात्रीपासून विद्युत गेली आहे. कंत्राटी मुले विद्युत पुरवठा का बंद पडला आहे, याची कारणे शोधत होती. त्यांचेसोबत विद्युत वितरणचे अधिकारी वायरमन उपस्थित नव्हते. आज आठवडी बाजाराचा दिवस असल्याने तसेच कार्यालयीन कामकाजाचा पहिला दिवस असल्याने ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांनी तहसिल कार्यालयात गर्दी केली. मात्र विद्युत नसल्याने त्यांना ताटकळत बसावे लागले.