महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:34 IST2021-02-05T08:34:36+5:302021-02-05T08:34:36+5:30

स्थानिक नेत्यांकडून मनधरणी : शिक्षण सभापतींचे राजीनामा नाट्य ठरले औटघटकेचे! अनिल गवई लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : स्थानिक शिक्षण ...

Mahavikas Aghadi internal differences on the rise! | महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर!

महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर!

स्थानिक नेत्यांकडून मनधरणी : शिक्षण सभापतींचे राजीनामा नाट्य ठरले औटघटकेचे!

अनिल गवई

लोकमत न्यूज नेटवर्क

बुलडाणा : स्थानिक शिक्षण सभापतींची मनधरणी करण्यात महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांना यश आले. त्यामुळे शिक्षण सभापती यांचे राजीनामा नाट्य औटघटकेचे ठरल्याचे चित्र आहे. दरम्यान, या सर्व प्रकारामुळे बुलडाणा नगरपालिकेतील महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आल्याची चर्चा पालिका वर्तुळात होत आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव या सर्वांत मोठ्या नगरपालिकेसह नऊ पालिकांमध्ये विषय समिती निवडणूक २१ जानेवारी रोजी पार पडली. यामध्ये काही अपवादात्मक पालिका वगळता, उर्वरित नगरपालिकांमध्ये प्रचंड राजकीय उलथापालथ झाल्याचे दिसून आले. जळगाव जामोद, नांदुरा, मलकापूर पालिकेत शांततेत निवडणुका पार पडल्या. मात्र, देऊळगावराजा, चिखली आणि बुलडाणा नगरपालिकेतील विषय समिती निवडणूक चर्चेत आली आहे. बुलडाण्यात सत्तेच्या वाटाघाटी फॉर्म्युल्यात नाराजी झाल्याने शिक्षण सभापतीपदी अविरोध विजयी झालेल्या गौसीयाबी सत्तार कुरेशी (राष्ट्रवादी काँग्रेस) यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला होता. मात्र, नंतर ‘समझोता’ झाल्यानंतर त्यांनी आपला राजीनामा मागे घेतला आहे. दरम्यान, सभापतींचे राजीनामा नाट्य पेल्यातील वादळ ठरले आहे.

चौकट..

स्थायी समितीवरून राजकारण तापले!

जिल्ह्यातील देऊळगावराजा नगरपालिकेत स्थायी समिती सदस्य निवडीचा वाद चांगलाच पेटला आहे. निवडणुकीदरम्यान सभागृहात बहुमत असलेल्या गटनेत्याला मान्यता न देता पूर्वीच्या गटनेत्याला ग्राह्य धरून त्यांनी सुचविलेल्या नगरसेवकांना स्थायी समितीत स्थान देण्यात आले. त्यामुळे देऊळगावराजा नगरपालिकेत राजकीय रणकंदन सुरू झाले आहे.

चौकट....

चिखलीत भाजप-काँग्रेसची मिलीभगत!

- चिखली नगरपालिकेच्या विषय समिती सभापती निवडणुकीत चक्क काँग्रेसच्या पाठिंब्याने भाजपचे नगरसेवक सभापतीपदी विराजमान झाले. पाणीपुरवठा सभापती देव्हडे यांच्या अर्जावर सूचक आणि अनुमोदक म्हणून काँग्रेसच्या नगरसेवकांनी स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे चिखलीतील काँग्रेस आणि भाजपमधील मिलीभगत चांगलीच चर्चेत आली आहे.

Web Title: Mahavikas Aghadi internal differences on the rise!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.