लुकमानने केली अपंगत्वावर मात

By Admin | Updated: December 3, 2014 01:23 IST2014-12-03T00:45:55+5:302014-12-03T01:23:50+5:30

लोकमत शुभवर्त

Lukman overcome the disability | लुकमानने केली अपंगत्वावर मात

लुकमानने केली अपंगत्वावर मात

नाना हिवराळे / खामगाव
तुम्हाला उडता येत नसेल तर पळा, पळता येत नसेल तर चाला, चालताही येत नसेल तर सांगा; पण सतत हालचाल करा, जेणेकरून दु:खाचे अश्रू पुसून तुमच्या चेहर्‍यावर नेहमी हास्य फुलत राहील. अशाच प्रकारचे हास्य चेहर्‍यावर ठेवून आपण अपंग असल्याची जाणीवही दुसर्‍याला होऊ न देता कठीण परिस्थितीत हसत-खेळत आलेल्या समस्यांना तोंड देऊन अपंग असलेल्या लुकमानने अपंगत्वावर मात करून आदर्श निर्माण केला आहे.
खामगाव तालुक्यातील बोथाकाजी येथील हाताचे अपंगत्व असलेला शेख लुकमान (३५) हा युवक ध्येय समोर ठेवून संघर्षमय जीवन जगत आहे. लुकमानचे पाचवीपर्यंंत शिक्षण होऊन घरची परिस्थिती हलाखीची असल्याने वडिलांबरोबर कामावर जाऊ लागला. गावातच लोकांच्या घरी सालाने घरगडी म्हणून तो कामास सुरू झाला. ढोरं वळणे, शेण काढणे तसेच शेतीची सर्व कामे करीत असे. १९९४ मध्ये ज्वारी काढत असताना त्याचा उजवा हात थ्रेशरमध्ये अडकला. सुदैवाने तो बचावला; मात्र यामध्ये उजवा हात दंडापासून वेगळा करावा लागला. यानंतर मात्र अपंग असतानाही पोटाची खळगी भरण्याकरिता नियमितपणे काम केल्याशिवाय पर्याय नाही हे तो ओळखून होता. दुसर्‍याकडे मजुरी न करता स्वत:चा व्यवसाय उभारण्यावर भर दिला. गावातीलच बसथांब्यावर लुकमानने चहा टपरीचे दुकान थाटले. चहासोबत नाश्ताही वाढविला. चहा टपरीच्या व्यवसायाला वर्षभरातच झेरॉक्स मशीनची साथ मिळाली. यामुळे नागरिकांशी संबंध वाढले. गावातही पहिलेच झेरॉक्स सेंटर झाल्याने नागरिकांची झुंबड दुकानावर आली. घरची हलाखीची परिस्थिती असताना इच्छा असूनही अपूर्ण राहिलेले शिक्षण लुकमानने कधी पूर्ण केले याची कुणालाच चाहूल नव्हती. पाचवीनंतर थेट त्याने १७ नंबरचा फार्म भरून दहावीची परीक्षा दिली. तो दहावी पास झाला. यानंतरही त्याची जिद्द पाहण्यासारखी आहे. दहावीनंतर तो बारावीही पास झाला. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठची बारावीची गुणपत्रिका अभिमानाने दाखवितो. आता पदवीपर्यंंत शिक्षण पूर्ण करण्याची त्याची इच्छा आहे.
जीवनात एकेक पायरी चढत असताना त्याने सांसारिक जीवनाची सुरुवात केली आहे. पत्नी व तीन मुले असलेला लुकमान संसारात यशस्वीपणे जगत आहे. आई-वडिलांच्या व भावांच्या सहकार्याने आपण व्यवसायाकडे झुकल्याचे तो सांगतो. आपल्या शिक्षणाची वाताहत झाली असली तरी मुलांना मात्र चांगले शिक्षण देण्याची इच्छा लुकमानने लोकमतशी बोलताना व्यक्त केली. एका हाताने अपंग असूनही स्वत:च्या जीवनाचा स्तर स्वत:च्या मेहनतीने उंचावणारा लुकमान हा अपंगत्वावर मात करणारे उदाहरण ठरला आहे.

Web Title: Lukman overcome the disability

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.