दारूबंदीसाठी महिलांची लोणार पोलीस स्टेशनवर धडक
By Admin | Updated: May 24, 2017 00:17 IST2017-05-24T00:17:03+5:302017-05-24T00:17:03+5:30
दारूबंदी न केल्यास आंदोलनाचा इशारा

दारूबंदीसाठी महिलांची लोणार पोलीस स्टेशनवर धडक
लोकमत न्यूज नेटवर्क
लोणार : दारूबंदीनंतरही शहरासह तालुक्यातील अनेक ढाब्यांवर सर्रास दारू विक्री सुरू असून वरली, मटका व गुटखा विक्री सुरू आहे, त्यामुळे युवक व्यसनाधीन होत आहे. तालुक्यात सुरू असलेले अवैध धंदे बंद करण्यात यावे, या मागणीसाठी २३ मे रोजी महिला लोणार पोलीस स्टेशनवर धडकल्या. त्यानंतर अवैध धंदे बंद करण्यात यावे, अशी मागणी तहसील कार्यालय व लोणार पोलीस स्टेशन येथे विनायक मापारी व आखाडे यांच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली.
गुटखाबंदी राज्यात केली असली, तरी लोणार तालुक्यात मात्र सहज गुटखा उपलब्ध होतो. वरली, मटका चोरी चुपके हॉटेल, खानावळीमध्ये खेळला जातो, तर आता दारूबंदी झाली असली, तरी शहरासह तालुक्यातील अनेक ढाबे, हॉटेल व खानावळीवर अव्वाच्या सव्वा किमतीत दारू उपलब्ध होत आहे. दारूबंदीच्या नावाखाली तिप्पट किमतीने दारू विकल्या जात आहे. खुलेआम गुटखा मिळत असल्यामुळे गुटखा खाणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे, तसेच चोरून दारू पिणाऱ्यांची संख्या सध्या वाढलेली दिसून येत आहे. यामुळे युवक व्यसनाधीन होत असून, कायदा व सुव्यवस्था धोक्यात सापडली आहे. त्यामुळे तालुक्यात सुरू असलेले सर्व अवैध धंदे बंद करण्यासाठी येथील महिलांनी पोलीस स्टेशन गाठले, तसेच सर्व अवैध धंदे बंद करण्याच्या मागणीचे निवेदन विनायक मापारी व अंबादास आखाडे यांच्या उपस्थितीत देण्यात आले. दारूबंदी न केल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला.