लोणारचा ‘ग्रीन हाऊस प्रकल्प’ ठरणार दिशादर्शक

By Admin | Updated: February 5, 2015 01:28 IST2015-02-05T01:28:08+5:302015-02-05T01:28:08+5:30

अतिक्रमकांसाठी प्रदुषणमुक्त घरकुलांची निर्मिती: केंद्र, राज्य आणि नगरपरिषदेचा संयुक्त उपक्रम.

Lonar's 'Green House Project' will be decided by the Director | लोणारचा ‘ग्रीन हाऊस प्रकल्प’ ठरणार दिशादर्शक

लोणारचा ‘ग्रीन हाऊस प्रकल्प’ ठरणार दिशादर्शक

मयुर गोलेच्छा/ लोणार:
जगप्रसिद्ध खार्‍या पाण्याच्या सरोवर काठावरील अतिक्रमणधारकांना स्थलांतरीत करण्यासाठी लोणार नगरपालिकेने शहराबाहेर सुरु केलेला ग्रीन हाऊस प्रकल्प हा देशातील पहिलाच प्रयोग असून, भविष्यात तो दिशादर्शक ठरणार आहे. या प्रकल्पांतर्गत भोगवटदारांना प्रदुषणमुक्त घरे मिळणार आहे.
सरोवर काठावरील ६0६ कुटूंबांना अतिक्रमीत जागेवरुन स्थलांतरीत करण्यासाठी २0१0 साली नगरपरिषद आणि अकोल्याच्या तांत्रिक सल्लागाराने ग्रीन हाऊसींग प्रकल्प राबविण्यासाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता. या प्रस्तावास सन २0१२ मध्ये केंद्र शासनाने मान्यता दिली. ग्रीन हाऊसींग प्रकल्पाचा प्रस्ताव तयार करताना लोणार शहराचे पौराणिक, वैज्ञानिक, भौगोलीक, तसेच ऐतिहासिक महत्व लक्षात घेवून बांधकामादरम्यान पर्यावरणावर परिणाम न होता प्रदुषणमुक्त घरांचा आराखडा तयार करण्यात आला. राज्यातीलच नव्हे तर जगभरातील पर्यटन स्थळ आणि खगोलशास्त्रज्ञांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या लोणार येथे एकात्मीक गृहनिर्माण आणि झोपडपट्टी सुधार कार्यक्रमांतर्गत ६0६ घरकुलांचा ग्रीन हाऊसिंग प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येत आहे.
ग्रीन हाऊसिंग प्रकल्पास या महिन्यात सुरुवात झाली असून, ऑगस्ट २0१५ पर्यंत तो पुर्णत्वास जाणार आहे. २0 कोटीच्या या प्रकल्पास ७0 टक्के निधी केंद्र सरकार, २0 टक्के निधी राज्य सरकार आणि १0 टक्के निधी स्थानिक प्रशासनाकडून उपलब्ध करुन देण्यात आला आहे. ६0६ घरांच्या या प्रकल्पास हुडको नवी दिल्लीकडून उत्कृष्ट ग्रीन हाऊसिंग प्रकल्पाचा पुरस्कार मिळाला आहे. येथे उभारण्यात येणार्‍या ग्रीन हाऊसिंग प्रकल्पामुळे लोणारचे नाव संपूर्ण देशात लोणार मॉडेल म्हणून गाजणार आहे.
नगरअघ्यक्षा रंजना मापारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ग्रीन हाऊस प्रकल्पाअंतर्गत अतिक्रमीत लाभार्थ्यांना १0 टक्के लाभार्थी हिस्सा भरावा लागणार असल्याचे स्पष्ट केले. १ लाख ७५ हजार रुपये एका घराची किंमत राहणार असून, स्वस्त दरात उच्च दर्जाचे प्रदुषणमुक्त घर अतिक्रमीत भोगवटदारांना उपलब्ध होणार असून पर्यावरणपूरक घरांची निर्मिती हे या ग्रीन हाऊस प्रकल्पाचे वैशिष्ट्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Lonar's 'Green House Project' will be decided by the Director

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.