स्थानिक सुट्टय़ांचा निर्णय आता शाळा समितीकडे
By Admin | Updated: September 17, 2015 23:53 IST2015-09-17T23:53:54+5:302015-09-17T23:53:54+5:30
शिक्षण विभागाने दिले स्थानिक सुट्टय़ांसंदर्भात अधिकार आता शाळा समितीकडे दिलेत.

स्थानिक सुट्टय़ांचा निर्णय आता शाळा समितीकडे
बुलडाणा : शाळांना सुट्टय़ा देण्याचे नियोजन हे शिक्षण विभागाकडे असते. त्यामुळे बरेचदा शाळांना स्थानिक सणांच्या सुट्टय़ा मिळत नव्हत्या. ही बाब शालेय शिक्षण विभागाच्या लक्षात आल्यामुळे शाळांना सुट्टी देण्याचे अधिकार आता पालक-शिक्षक संघ आणि शाळा व्यवस्थापन समितीला देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. राज्यातील विविध शिक्षकांच्या संघटनांनी यापूर्वी सणांसाठी सुट्टीची मागणी शिक्षण विभगाकडे वेळोवेळी केली होती. त्यामुळे शिक्षण विभागाने स्थानिक सुट्टय़ांचे हे अधिकार किंवा सुट्टीत बदल करण्याचा निर्णय शाळांना देण्याचा निर्णय घेतला आहे; मात्र सुट्टी देताना शिक्षण हक्क कायद्यातील नियमानुसार पहिली ते पाचवीच्या वर्गासाठी २00 दिवस आणि ८00 घड्याळी तास, सहावी ते आठवीच्या वगार्साठी २२0 दिवस व एक हजार घड्याळी तास पूर्ण करणे सक्तीचे राहणार आहे. माध्यमिक शाळा संहिता नियमानुसार शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या सुट्टय़ा ७६ दिवसांपेक्षा जास्त देता येत नाहीत. कामाचे दिवस २३0 होणे आवश्यक आहे. नियमांचा आधार घेत शाळा व्यवस्थापन समिती व पालक-शिक्षक संघाची सहमती, शिफारशी आणि स्थानिक मागणीनुसार शिक्षणाधिकारी यांच्या परवानगीने शाळांना सुटी देता येईल. सुट्टीच्या काळात परीक्षा न घेण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत. याशिवाय शिक्षण विभागाने वेळोवेळी ठरवलेल्या शिक्षण हक्क कायद्याचे पालन संबंधित शाळांना करावे लागणार आहे.