कोब्रा नर-मादीला दिले जीवनदान
By Admin | Updated: March 22, 2017 01:44 IST2017-03-22T01:44:19+5:302017-03-22T01:44:19+5:30
कोब्रा नर-मादीला विहिरीतून काढून जंगलात सोडून जीवनदान

कोब्रा नर-मादीला दिले जीवनदान
लोणार(जि. बुलडाणा), दि. २१- शहरानजिकच्या शेतातील विहिरीत कोब्रा जातीचे नर - मादी पडल्याचे शेतमजुराच्या लक्षात आले. त्यांनी शेतमालक संदीप मापारी यांना कळविले. ही बाब गांभीर्याने घेत, वनपरिक्षेत्र अधिकारी इंगोले यांच्या मार्गदर्शनानुसार, शहरातील उद्यसिंग पवार व विजय नेवरे यांच्या प्रयत्नाने कोब्रा नर-मादीला विहिरीतून काढून जंगलात सोडून जीवनदान दिले.
शहरापासून काही अंतरावरच संदीप मापारी यांचे शेत असून, त्याठिकाणी त्यांचा बकरी पालनाचा व्यवसाय आहे. त्याठिकाणी काम करण्यासाठी शेतमजूर राहतात. शेतात नेहमीच वावर असणार्या नर-मादी कोब्रा साप प्रणयक्रीडा करत असताना विहिरीच्या जवळ गेले आणि त्यांचा तोल जाऊन ते किमान ६0 फूट खोल असलेल्या विहिरीत पडले, ही बाब शेतमजुराच्या लक्षात आली असता, त्यांनी लगेच शेतमालकाला कळविले. शेतमालक संदीप मापारी यांनी सापाला जीवनदान मिळावे, यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी इंगोले तसेच सर्पमित्र वनिता बोराडे यांच्याशी संपर्क साधला. विहिरीत पडलेल्या सापाला जीवनदान देण्यासाठी कोणतीही यंत्रणा वन विभागाकडे नाही, तरीही त्यांनी हार न मानता बिबट्या पकडण्यात सिंहाचा वाटा असणार्या लोणार येथील उदयसिंग पवार व विजय नेवरे यांना पाचारण केले. वन्यजीव जतन व संवर्धन करण्याचा वसा घेतलेल्या या दोघांनी बांबूला दोरीचा फास बांधून दहा फूट लांब असलेल्या कोब्रा नर-मादीला कसलीही इजा न होऊ देता सुखरूप विहिरीतून बाहेर काढले. त्यानंतर त्यांना जंगलात सोडून देऊन जीवदान दिले. यावेळी वन विभागाचे व्ही.एस.ढाकणे, यू.डी.कोकाटे उपस्थित होते.