वन विभाग बनविणार झाडांची ‘आॅनलाइन लायब्ररी’!

By Admin | Updated: May 20, 2017 00:24 IST2017-05-20T00:24:21+5:302017-05-20T00:24:21+5:30

व्हॉट्स अ‍ॅप, फेसबूकसह सोशल मीडियावरही टाकणार झाडांची माहिती

'Libraries of trees' to create forest department! | वन विभाग बनविणार झाडांची ‘आॅनलाइन लायब्ररी’!

वन विभाग बनविणार झाडांची ‘आॅनलाइन लायब्ररी’!

विवेक चांदूरकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जंगलातील विविध वृक्षांची ओळख व्हावी; औषधयुक्त वृक्षांची माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी, तसेच दुर्मीळ वृक्षांचे जतन व्हावे, याकरिता वन विभागाच्यावतीने आॅनलाइन लायब्ररी तयार करण्यात येणार आहे. या लायब्ररीमध्ये सर्वच प्रकारच्या वृक्षांची माहिती व त्याचे महत्त्व विषद करणाऱ्या पुस्तकांचा समावेश राहणार आहे.
राज्यातील वनामध्ये अनेक दुर्मीळ वनस्पती, वृक्ष, विविध प्रकारचे गवत आहे. यापैकी काही वनस्पती दुर्मीळ तर काही औषधयुक्त आहे; मात्र त्याची माहिती अनेकांना नाही. वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही जंगलातील सर्व वनस्पती व वृक्षांची माहिती नसते. परिणामी, त्यांचे योग्यप्रकारे संवर्धन करण्यात येत नाही.
त्यामुळे सर्वांना वृक्षांसंबंधीची माहिती व्हावी, याकरिता आॅनलाइन लायब्ररी तयार करण्याचा निर्णय वन विभागाने घेतला आहे. यानुसार जंगलात काम करणारे मजूर किंवा कर्मचारी जंगलात असलेल्या विविध वृक्षांचे, वनस्पतींचे फोटो काढून आणणार आहेत. एकाच झाडाचे चहूबाजूने, तसेच पानांचे खोडाचे, फुलांचे छायाचित्र काढण्यात येईल. वर्षाच्या वेगवेगळ्या कालखंडात झाडांचे फोटो काढण्यात येणार आहेत. त्यानंतर सदर छायाचित्र वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे देण्यात येईल. त्यानंतर झाडांचे छायाचित्र व माहितीसह लायब्ररी तयार करण्यात येईल. यामध्ये झाडाच्या शास्त्रीय नावापासून तर गुणधर्म कोणते आहेत, कोणत्या ऋतूमध्ये फुले व फळे येतात, याचीही माहिती राहणार आहे. ही लायब्ररी पूर्णत: आॅनलाइन असणार आहे.

सोशल मीडियावर मिळणार झाडांची माहिती
लायब्ररीमध्ये असलेल्या झाडांची माहिती वन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या व्हॉट्स अ‍ॅप ग्रूपवरही टाकण्यात येणार आहे. ज्या भागात जी झाडे आहेत, त्या भागातील कर्मचाऱ्यांच्या व्हॉट्स अ‍ॅप ग्रूपवर सदर माहिती टाकण्यात येईल. त्यामुळे झाडे ओळखणे सहज सोपे होणार आहे, तसेच फेसबूकवर टाकण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वांनाच आपल्या भागातील झाडे व त्यांचे महत्त्व कळू शकणार आहे.

नव्या अधिकाऱ्यांना मिळेल माहिती
वन विभागामध्ये अधिकाऱ्यांच्या वारंवार बदल्या होत असतात. नव्याने बदलून आलेल्या अधिकाऱ्यांना आपल्या कार्यक्षेत्रात असलेल्या जंगलातील झाडांची माहिती व्हायला वेळ लागतो. या लायब्ररीमुळे अधिकाऱ्यांना कमी वेळात झाडांची परिपूर्ण माहिती मिळणार आहे, तसेच वन विभागात नव्याने रूजू होणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही त्वरित झाडांची संपूर्ण माहिती मिळणार आहे.

Web Title: 'Libraries of trees' to create forest department!