कमी पटसंख्येच्या शाळा संकटात !
By Admin | Updated: September 2, 2015 02:28 IST2015-09-02T02:28:38+5:302015-09-02T02:28:38+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील ३१ शाळांचा ‘रेड झोन’मध्ये समावेश.

कमी पटसंख्येच्या शाळा संकटात !
बुलडाणा : कमी पटसंख्या असलेल्या विद्यार्थी संख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाच्या विचाराधिन आहे. याबाबत आदेश देऊन जिल्ह्यात चाचपणी सुरू झाली आहे. अशा कमी पटसंख्या असलेल्या जिल्ह्यातील ३१ शाळांना फटका बसणार असून, त्या शाळेतील शिक्षक अतिरिक्त ठरण्याचा धोका निर्माण झाला आहे. यावर्षी शासनाने पटसंख्या कमी असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे. बंद होणार्या शाळांचे समायोजन किलोमीटर अंतर असलेल्या शाळेत करण्याची कार्यवाही प्रशासनस्तरावर होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात ३९४ शाळा आहेत. त्यापैकी २0 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या प्राथमिक शाळेत शासकीय १, जिल्हा परिषदेच्या १७, नगरपालिकेची १ व स्वयंअर्थसहाय्यीत १२ अशा एकूण ३१ शाळा आहेत. ३0 पेक्षा पटसंख्या कमी असलेल्या उच्च माध्यमिक शाळेत स्वयंअर्थसहाय्यीत १, आदिवासी आश्रम शाळा १ अशा २ शाळा आहेत. तर ४0 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या स्वयंअर्थसहाय्यीत ५ शाळा आहेत. याबाबत शासनाच्या आदेशान्वये शाळांची पटसंख्या तपासणी करण्यात येत असून, २0 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या ३१ शाळा बंद होणार असल्याचे संकेत आहेत. या ३१ शाळांचे शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता आहे.