भरधाव दुचाकीच्या धडकेत बिबट्या जखमी; हल्ल्यात वनकर्मचारी जखमी
By संदीप वानखेडे | Updated: June 18, 2023 19:39 IST2023-06-18T19:39:11+5:302023-06-18T19:39:21+5:30
भरधाव दुचाकीने रस्ता ओलांडत असलेल्या बिबट्याला जोरदार धडक दिली.

भरधाव दुचाकीच्या धडकेत बिबट्या जखमी; हल्ल्यात वनकर्मचारी जखमी
बुलढाणा : भरधाव दुचाकीने रस्ता ओलांडत असलेल्या बिबट्याला जोरदार धडक दिली. यात बिबट्याला गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना १७ जून राेजी सायंकाळी बुलढाणा- खामगाव मार्गावरील ज्ञानगंगा अभयारण्यातील जुना देव्हारी फाट्याजवळ घडली हाेती. दरम्यान, १८ जून राेजी या जखमी बिबट्याने शाेध घेत असलेल्या वन कर्मचाऱ्यावर हल्ला केला. यामध्ये वनकर्मचारी गंभीर जखमी झाला आहे.
खामगाव येथील दाेन युवक दुचाकीने बुलढाण्यावरून आपल्या गावाकडे १७ जून राेजी जात हाेते. दरम्यान, ज्ञानगंगा अभयारण्यातील जुना देव्हारी फाट्याजवळ रस्ता ओलांडत असलेल्या बिबट्याला त्यांनी जोरदार धडक दिली. यात बिबट्या गंभीर जखमी झाला तर दुचाकी रस्त्याच्या बाजूला खड्ड्यात जाऊन पडली. यामध्ये दोन्ही युवकदेखील जखमी झाले होते. या घटनेची माहिती मिळताच बुलडाणा आरएफओ चेतन राठोड, वनपाल संजय राठोड व इतर वन कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.
त्यावेळी बिबट्या जखमी अवस्थेत दिसून आला तर केटीएम बाईक खड्ड्यात पडून होती. तसेच दुचाकीचालक त्या ठिकाणाहून निघून गेले होते. जखमी बिबट्याला पकडून उपचार करण्यासाठी बुलढाणा वन विभागाची रेस्क्यू टीम व पशुवैद्यकीय अधिकारी यांना बोलविण्यात आले.
परंतु बिबट्या आक्रमक होता व अशात रात्रीचा अंधार झाल्याने रेस्क्यू करणे शक्य नव्हते. त्यामुळे, १८ जून राेजी सकाळी जखमी बिबट्याला बेशुद्धचे औषध मारून बेशुद्ध करण्यात आले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने बिबट्याला उपचारासाठी नागपूर येथील गोरेवाडा झूमध्ये रवाना करण्यात आले आहे. बिबट्याला धडक मारून जखमी करणाऱ्या दुचाकीचालकाविरुद्ध वन गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती बुलडाणा आरएफओ चेतन राठोड यांनी दिली आहे.
शाेध माेहिमेदरम्यान बिबट्याने केला हल्ला
वन विभागाच्या वतीने रविवारी बिबट्याचा शाेध सुरू केला. पथक बिबट्याचा शाेध घेत असताना प्रमोद रामदास राठोड ४० वर्षे रा. डोंगरखंडाळा हे कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यांना सुरुवातीला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार केल्यानंतर त्यांना एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.